Breaking News

संकटग्रस्तांचे प्रेरणास्थान : अहिल्यादेवी होळकर

Advertisements

#संकटग्रस्तांचेप्रेरणास्थान : अहिल्यादेवीहोळकर*

Advertisements

अहिल्या हे नाव ऐकलं की आपल्या समोर येतात त्या पुराणातील अहिल्या. जी एका ऋषीची बायको होती. ऋषीने स्वतःच्या पत्नी अहिल्येला दगड बनण्याचा शाप दिला आणि ती दगड बनली. नंतर त्या दगडाला रामाच्या पायाचा स्पर्श झाला आणि अहिल्या दगडातून स्त्रीच्या रूपात आल्या. परंतु मी या ठिकाणी ज्या अहिल्या विषयी सांगणार आहे, त्या अहिल्येच्या स्पर्शाने रामासहित सर्व देवांचा उद्धार झाला. ती अहिल्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर. जिने जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंचा वारसा चालविला. त्या अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी माणकोजी शिंदे व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी झाला. अहिल्याईचा वयाच्या अवघ्या आठाव्या वर्षी इंदौर येथील होळकर संस्थानाचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी 20 मे 1733 रोजी पुण्यात विवाह झाला.
जिजाऊ – शहाजीराजेंच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात स्वराज्य स्थापन केले. पुढे हा स्वराज्याचा वारसा संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी चालविला. संभाजीपुत्र पहिले शाहू औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर त्यांनी सातारा येथे स्वराज्याच्या गादीची स्थापना केली. त्यांनी सन 1713 ला बाळाजी विश्वनाथ भट या ब्राम्हणाला पेशवेपद दिले. त्या बाळाजी पेशव्याने छत्रपतीपद नामधारी करून पेशवेपद बळकट केले. पुढे पेशव्याने स्वराज्य बुडविले. अन्यायी – अत्याचारी पेशवाईचा जन्म झाला. पेशव्यांनी लोककल्याणाचे कार्य सोडून दिल्यामुळे अनेक सरदारांनी आपापली वेगवेगळी संस्थाने निर्माण केलीत. त्यातीलच एक म्हणजे मल्हारराव होळकर. या लोककल्याणकारी सरदाराने इंदौर येथे होळकर संस्थानाची स्थापना केली. त्याच होळकर घराण्यात अहिल्यादेवीचा सून म्हणून प्रवेश झाला. पुढे याच अहिल्यादेवीने जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताराराणीचा वारसा चालविण्याचे कार्य केले आहे.
#संकटग्रस्तांनाऊर्जादेणारेपात्र :- अहिल्यादेवीचा खंडेरावाशी लग्न झाले, परंतु 17 मार्च 1754 ला खंडेरावांचा कुंभेरी किल्ल्याच्या लढाईत मृत्यू झाला. वयाच्या 29 व्या वर्षी अहिल्यादेवी विधवा झाल्या. आज जिथे 30 व्या वर्षापर्यंत अनेक मुलींचे लग्न होत नाही त्या वयात त्या विधवा झाल्यात. त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. पती मृत्यूनंतर आईची माया देणाऱ्या सासू गौतमाबाईचा मृत्यू 29 सप्टेंबर 1761 ला झाला. वडिलांची माया देणारे आणि त्यांच्या निर्णयामागे भक्कमपणे उभे राहणारे सासरे मल्हारराव होळकर यांचा 20 मे 1766 ला मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा मालेराव यांचा 27 मार्च 1767 रोजी मृत्यू. मुलगी मुक्ता हिचा मुलगा नाथोबा या नातवाचा 1790 ला मृत्यू. तर जावई यशवंतराव फणसे यांचा 3 नोव्हेंबर 1791 ला मृत्यू आणि मुलगी पती मृत्यूमुळे सती गेली. सर्व हक्काची माणसे काळाने एकामागून एक हिरावून घेतली. परंतु न डगमगता धीरोदात्तपणे लोकांच्या कल्याणाकरिता अहोरात्र वयाच्या 70 वर्षापर्यंत कष्ट घेत राहिल्यात. म्हणूनच अहिल्यादेवी या देशातील्या संकटग्रस्त झालेल्या स्त्री आणि पुरुषाला ऊर्जा देवून, संकटाला उध्वस्त करुन यशस्वी होण्याकरिता प्रेरणा देणारे एक महान पात्र आहे.

Advertisements

#घाटांचीनिर्मितीका? :- सूरुवातीच्या काळात लोकवस्ती प्रामुख्याने नदी काठावर असायची. त्यामुळे पाणी भरणे, कपडे धुणे हे नदीच्या पाण्यावर अवलंबून असे. मात्र पाण्याकरिता नदीत उतरतांना बऱ्यचदा अनेकांचा जिव जायचा, म्हणून अहिल्यादेवीने नदी काठावर घाटांची निर्मिती केली. तसेच नदी किनाऱ्यावरील मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना आंघोळ करणे सोयीचे व्हावे म्हणून उत्तम अशा घाटांची बांधणी केली. त्यांचा घाट निर्मिती मागचा उद्देश आम्ही समजून घेणे आवश्यक आहे.
#काल्पनिक_चित्र :- अहिल्यादेवी होळकर उत्तम राज्यकर्त्या बरोबर कुशल सेनापतीही होत्या. घोड्यावर बसून आणि हातात तलवार घेवून त्यांनी बऱ्याचदा शत्रुंना सळो कि पळो करुन सोडले होते. मात्र इथल्या मनुवादी, वैदिक व्यवस्थेने घोड्यावर बसून हातात तलवार घेतलेले चित्र न रेखाटता. हातात पिंड घेवून असलेले चित्र आमच्या समोर आणले. आम्ही बैताळानीही ही त्यांचे कार्य पिंडी पुरते मर्यादित करुन टाकले. अहिल्याईचे हातात पिंड घेवून असणारे काल्पनिक चित्र आमच्या मनावर का बिंबवले. कारण पूजा, अर्चा, पुरोहितांना दान दक्षिणा, आणि धर्म रक्षणाकरिता त्यांनी आयुष्य खर्ची घातले. तुम्ही अहिल्याईला आपले प्रेरणास्थान मानता तर मग तुम्ही आयुष्यभर हेच केले पाहिजे. हे बिंबवण्याकरिता त्यांचे काल्पनिक चित्र लोकांसमोर आणले. मित्रानो प्रश्न असा आहे कि, या देशातील धर्मशास्त्राने स्त्रीला धर्म रक्षणाची परवानगी दिली आहे का? जर दिली असती तर अनेक मंदिरात स्त्रियांना प्रवेश का नाही? उदा. शबरीमाला
एखाद्या स्त्रीने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर तिला जेव्हा विरोध होतो तेव्हा का देवाच्या नावाने व्रत वैकल्य, उपवास करणाऱ्या समस्त उच्च शिक्षित स्त्रिया त्या महिले सोबत ठामपणे उभे रहात नाही.? त्यामागचं कारण म्हणजे संघर्ष करुन शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्री माईला विसरण्याबरोबर लेखणीचे अस्त्र व शब्दाचे शस्त्र करुन अन्याया विरुद्ध पेटून उठता येतो हेच आमच्या महिला विसरून बसल्यात.

#लोकोपयोगी_कार्य :- 20 मे 1766 ला सासरे मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर होळकर संस्थांनाच्या कारभाराची सर्व जबाबदारी अहिल्यादेवीकडे आली होती. अहिल्यादेवीने आपल्या बुद्धीने चाणाक्षपणे प्रजाहित साधणारे धोरण आखून त्यांची उत्तम अंमलबजावणी केल्यामुळे, त्या उत्तम प्रशासका बरोबर प्रजाहितदक्ष लोकमाता ठरल्या. दया तिचे नाव | भुताचे पालन | आणिक निर्दलन, कंटकाचे | या विचारांनुसार त्यांनी राज्यकारभार केला.
1) पर्यावरण विषयक :- अहिल्यादेवीने प्रत्येक शेतकऱ्यांना दरवर्षी 20 झाडे लावण्याची शक्ती केली होती. 20 झाडांपैकी नऊ झाडे शेतकऱ्यांची तर 11 झाडे सरकारचे असे नियोजन करुन निसर्गाचा समतोल राखन्यासाठी प्रयत्न केला.
2) तंटामुक्त समितीची पायाभरणी :- त्या काळातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे अहिल्यादेवी होळकर. तरीपण गावागावात जर तंटे निर्माण झाले तर ते गावातच सोडविण्यासाठी तंटामुक्त समित्याची स्थापना करण्यात आली होती.
3) हुंडा प्रथा बंद :- त्या काळात अहिल्यादेवीने हुंडा विरोधी कायदा केला होता. त्यात त्या म्हणतात, “विवाह समयी कन्येकडून कोणी द्रव्य घेईल ते द्रव्य सरकारी जमा करुन दंड करण्यात येईल. ” अहिल्यादेवीच्या याच कायद्याची प्रेरणा घेवून भारत सरकारने हुंडा विरोधी कायदा तयार केला आहे.
4) आंतरजातीय विवाह :- संस्थानातील दक्षिण भागात चोर – डाकुंचा जनतेला प्रचंड त्रास होता. त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता अहिल्यादेवीने एक घोषणा केली की, “जो कोणी विर राज्यातील डाकू लोकांचा बंदोबस्त करेल त्या वीराशी माझ्या एकुलत्या एक मुक्ता या कन्येचा विवाह लावून देईल.” अहिल्यादेवीच्या या आव्हानाला यशवंत फणसे या आदिवासी समाजातील तरुणाने प्रतिसाद देवून डाकू आणि चोरांचा बंदोबस्त केला. पुढे मुक्ता या त्यांच्या मुलीचा विवाह यशवंताशी लावून दिला. प्रजेच्या कल्याणाकरिता आपल्या एकुलत्या एका लेकीला राज्याच्या भल्याकरिता डावावर लावणाऱ्या जगातील एकमेव राज्यकर्त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर.
5) सन 1785 मध्ये अहिल्यादेवीने माहेश्वर ते पुणे अशी पहिली भारतातील टपाल सेवा सुरु केली.
6) गरीब अपंग, गरजू लोकांकरिता मोफत अन्नदान करणाऱ्या अन्नछत्राची स्थापना केली होती.
7) पडीक जमिनी मोठया प्रमाणात लागवडीखाली आणून अन्न धान्याचे उत्पादन वाढविले.
8) निराधार, विधवा, परीत्याक्त्या स्त्रियांसाठी महिलाश्रम, अनाथाश्रम, कुटीरोउद्योग उभारून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.
या व्यतिरिक्त मोठया प्रमाणात अहिल्यादेवीने कार्य केले आहेत. कारण अहिल्यादेवीला फक्त सुखी प्रजा हवी होती. जेव्हा जेव्हा महिला सत्तेवर येतात, तेव्हा त्या उत्तम राज्यकारभार करतात ; कारण त्यांच्याकडे मातृहर्दय असते. संकटाला सामोरे जावून भविष्य घडविण्यापेक्षा निराश होवून जीवन संपवीण्याचा विचार करणाऱ्या महिलांनी एकदा तरी जिजाऊ – ताराराणी – सावित्रीमाई फुले आणि अहिल्यादेवीचे चरित्र वाचून, त्यातून प्रेरणा घेवून आपल्या जीवनातील आनंद उपभोगावा. अशी इच्छा व्यक्त करुन अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करतो.
=========== अनिल भुसारी, तुमसर, जि. भंडारा 8999843978

Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *