प्रशासनाने व्यापार्यांचा सन्मान करावा : आ. मुनगंटीवार
– समस्येवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकार्यांसोबत बैठक
चंद्रपूर-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे महानगरातील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने व्यापार्यांकडून दंड वसूल करणे बंद करावे आणि त्यांना सन्मानजनक वागूणक द्यावी, असे सांगत व्यापार्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शनिवारी व्यापारी व जिल्हाधिकारी यांची बैठक लावण्याच्या सूचना माजी राज्यमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा पदाधिकार्यांना दिल्या.
येथील विश्रामगृहात गुरुवार, 3 जून रोजी व्यापार्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. गुरुवारी मनपा प्रशासनाने महानगरातील काही व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई केली गेली. मात्र, मागील दोन महिन्यांपासून टाळेबंदीमुळे त्यांचे व्यवसाय ठप्प असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाविरोधात तीव्र रोष आहे. त्यांनी मुनगंटीवार यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत व्यापार्यांनी आपल्या समस्या मांडत आम्हाला दुकाने सुरू करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली. यावेळी मुनगंटीवार यांनी, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व्यापारी व जिल्हाधिकारी यांची शनिवारी बैठक लावण्याचा सूचना मनपा पदाधिकांर्याना दिल्या. बैठकीला महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहीते, उपायुक्त विशाल वाघ, धनंजय सरनाईक, शहराध्यक्ष मंगेश गुलवाडे, फेडरेशन ऑफ ट्रेडर्स अॅन्ड इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष रामकिशोर सारडा, सुमित कोतपल्लीवार, अरविंद सोनी, दिनेश बजाज, अनिल टहलियानी, दिनेश नथवानी, चंद्रकांत उमाटे यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.