Breaking News

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून

आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून

Ø निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 20 दिवसांत पूर्ण करावे

चंद्रपूर, दि. 10 जून: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेची ऑनलाईन सोडत 7 एप्रिल 2021 रोजी  काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड यादीत सोडत लागली आहे, त्या पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ) दिपेंद्र लोखंडे यांनी केले आहे.

सन 2021-22 या वर्षाची आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दि.11 जून 2021 पासून सुरू करण्यात येत आहे. तसेच निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता 20 दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये. शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर देण्यात येईल. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.

बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवासी पत्त्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रांवरून शाळा व निवासी पत्त्याच्या अंतराची पडताळणी करण्यात येईल. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देऊ नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समितीकडे अर्ज करता येईल. पडताळणी समितीने त्यांच्याकडे आलेले अर्ज व तक्रारीची शहानिशा करूनच प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरु होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देऊ नये याबाबतचा आदेश शाळांना द्यावा. त्या आदेशाप्रमाणे शाळेने कार्यवाही करावी.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरीत्या शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनी, ई-मेल, व्हाट्सअॅपद्वारे शाळेत संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादी मधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबत सविस्तर सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जातील.

About Vishwbharat

Check Also

राज्यभर संगणक टंकलेखन परीक्षा घोटाळा : किती जणांनी दिली बाहेरून परीक्षा?

संगणक टंकलेखन परीक्षा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे स्थित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सतर्कतेमुळे या …

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *