क्रिकेटपटू ट्रेव्हिस हेडने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आणि विश्वषचकावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारतीय संघ २४० धावांवर गारद झाला होता. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला गेला. यावरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. “जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारतीय संघाचा पराभव झाला,” असं म्हणत महुया मोईत्रा यांनी भाजपाचा डिवचलं आहे.
‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर महुआ मोईत्रा यांनी लिहिलं, “अहमदाबादमधील स्टेडियमचं नाव बदललं. जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाला.”
दुसऱ्या पोस्टमध्ये महुआ मोईत्रा म्हणाल्या, “ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) छापेमारी केली.”
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं लक्ष्य मिळालं होतं. भारताकडून के. एल राहुलने सर्वाधिक ६६ धावांची तर विराट कोहलीने ५४ धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने अवघ्या ३१ चेंडूत ४७ धावा केल्या.
प्रत्युत्तरात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने १३७ धावांची शतकी खेळी केली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद २ धावा केल्या.