विश्व भारत ऑनलाईन :
उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या,त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण, जेथे चुकीचे झाले तिथली चौकशी सुरू राहील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे शनिवारी विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार यांनी या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर प्रश्न विचारला असताना फडणवीस यांनी ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र संशय असलेल्या ठिकाणची चौकशी सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.