विश्व भारत ऑनलाईन :
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वारुळवाडी शिवारात लागोपाठ दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाले. सोमवारी (दि. १९) सकाळी वारुळवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील रा. प. सबनीस शाळेच्या आवारामध्ये मुलींच्या वसतिगृहासमोर बिबट्या ठाण मांडून बसल्याचे आढळल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.
वनविभाग व रेस्क्यू टीम यांनी सापळा लावून बिबट्याला जेरबंद केले. हा बिबट्या साधारण एक वर्ष वयाचा असल्याचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी सांगितले. वारुळवाडी येथील भर वस्तीत असणाऱ्या रा. प. सबनीस विद्यामंदिर या शाळेत सुमारे साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी रोज शिक्षण घेत आहेत. या शाळेत अगदी हाकेच्या अंतरावर शाळेजवळ बिबट्या लिंबाच्या झाडाखाली ठाण मांडून बसल्याचे आढळून आला. शालेय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ विद्यार्थ्यांना सोडून दिले व या घटनेची माहिती शाळा प्रशासनाने वनविभागाला कळवली.