विश्व भारत ऑनलाईन :
सीएनजीत दरवाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून पुकारलेला बंद तूर्तास मागे घेतला होता. मात्र, १३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
२६ सप्टेंबरपासून हा बेमुदत संप सुरू होणार असल्याची त्यांनी परिपत्रकात म्हटले आहे. १३ सप्टेंबररोजी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी आमच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली होती. यावेळी राज्य सरकार मुंबई टॅक्सी मेन्स युनियनच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणार असून संप मागे घ्यावी, अशी विनंती उद्य सामंत यांनी केली होती. त्यानुसार आम्ही संप मागे घेतला होता. मात्र, उदय सामंत यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे मुंबई टॅक्सी मेन्स युनियन आणि ऑटो-रिक्षा युनियनने २६ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.