विश्व भारत ऑनलाईन :
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट मोदी सरकारने दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी सोमवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते देण्यात आले असून, सोमवारी दिला जाणारा हप्ता हा बारावा राहणार आहे.
देशभरातील दोन कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ
‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ अर्थात डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजार रुपये वर्ग होतील. वर्षातून तीनदा शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मदत स्वरूपात दिले जातात. देशभरातील दोन कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ होत आहे. किसान सन्मान योजनेसाठी 16 हजार कोटी रुपये सोमवारी जारी केले जातील. 2019 साली सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीने सोमवारी नवी दिल्ली येथे शेतकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशभरातील 13 हजारपेक्षा जास्त शेतकरी तसेच सुमारे पंधराशे कृषी स्टार्टअप हे या संमेलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय वेगवेगळ्या संस्थांशी जोडले गेलेले एक कोटी शेतकरी आभासी मार्गाने संमेलनात भाग घेणार आहेत.