विश्व भारत ऑनलाईन :
औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला.
मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. पाहणी करताना भुमरे सरकारी दवाखान्याच्या दंत चिकित्सा विभागात पोहोचले. भुमरेंनी व्यवस्थेची विचारपूस केली. आणि त्यानंतर त्यांच्या दातांची तक्रार डॉक्टरांना सांगितली.
तपासणीनंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. मग भुमरेंनी आधी रुट कॅनल केले आणि त्यानंतर शस्रक्रियेसाठी दवाखान्यात पोहोचले. खुद्द मंत्र्यांची शस्रक्रिया म्हटल्यावर सर्व डॉक्टर हजर राहिले. मात्र, ऐनवेळी लाईट गेली आणि सारा गोंधळ झाला.
पण, ऑपरेशन थिएटरमध्ये अनेक डॉक्टर उपस्थित असल्यामुळे सर्वांनी एकाचवेळी मोबाईल टॉर्च वापरुन ऑपरेशन पार पाडले