✍️मोहन कारेमोरे :
शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यांचे ५ पैकी 3 जागेवरील उमेदवार निवडून आले आहे. नाशिकमधील जागा महाविकास आघाडीने गमावली असली तरी, नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीने अपेक्षित यश मिळविले आहे.
दुसरीकडे निवडणूकीत भाजपला केवळ 1 जागा मिळाली आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणूकीत 5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
नागपुरात भाजपला धक्का
देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपला मोठा धक्का बसला. नागपुर शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला.
अडबाले यांना 16 हजार 500 मते मिळाली, तर गाणार यांना 6 हजार 366 मतांवर समाधान मानावे लागले.
औरंगाबादेतून विक्रम काळे विजयी
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे चौथ्यांदा विजयी झाले. निवडणूकीत विक्रम काळे यांना पारड्यात मतदारांनी भरभरून मतं टाकली असून त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा 6 हजार 937 मतांनी पराभव केला आहे.
या मतमोजणीला तब्बल 15 तास लागले. दुसऱ्या पसंतीच्या मतांची ही मोजणी करण्यात आली. विक्रम काळे विजयी होताच, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. भाजपने मोठी ताकद लावूनही मतदारांनी त्यांना जागा दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार सतीश चव्हाण यांनी दिली.
अमरावतीत मविआचे धीरज लिंगाडे विजयी
अमरावती निवडणूकीत झालेल्या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. धीरज लिंगाडे यांना 43 हजार 340 मतं, तर रणजित पाटील यांना 42 हजार 027 मतं मिळाली आहेत.
नाशिकमध्ये सत्यजित तांबेंचा विजय
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला.महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कोकणमध्ये भाजपचा विजय
कोकण विधान परिषद निवडणूकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात सरळ लढत होती. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9 हजार 500 मते मिळाली.
विश्वभारत News Website