तलाठी भरतीच्या नावाखाली राज्यात बेरोजगार तरुणांची फसवणूक होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भरतीच्या नावाखालील हजार-हजार रुपये जमा केले जात आहेत. हे पैसे कोणाच्या खात्यात जातात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात शासनाला निट परीक्षाही घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यभरातील तलाठी भरती परीक्षेंच्या केंद्रावर सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर विधान सभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा सावळ्या गोंधळामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत हे सरकार गंभीर नाही
सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी भरती परीक्षेसाठी लांबचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आज प्रचंड मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांच्या मुलांकडून परीक्षेच्या नावावर सरकारने 1000 रुपये शुल्क आकारणी करायची, दूरचे परीक्षा केंद्र द्यायचे आणि वरून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होईल, असे व्यवस्थापन करायचे हा धंदाच या सरकारने सुरू केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत हे सरकार गंभीर नाही,ही बाब आता विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना स्पष्ट झाली आहे.