नागपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अलिकडेच घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी केला आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. लिखित परीक्षेचे व मुलाखतीचे गुण वेगवेगळे घोषित न केल्याने यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मौदा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे.
पोलिस पाटील पदांसाठी २६ जून २०२३ रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर लिखित परीक्षा घेण्यात आली. त्याचदिवशी संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांची उत्तीर्ण व अनुत्तीर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, सर्व उमेदवारांच्या यादीमध्ये गुण नमूदच नसल्याने या प्रक्रियेवरच शंका उपस्थित करण्यात येत आहे. परीक्षेत किती गुण मिळाले, हे जाणून घेणे हा त्या विद्यार्थ्याचा अधिकार आहे. याबाबत विचारणा केली असता मुलाखतीनंतर दोन्ही गुण जाहीर केले जातील, असे सांगण्यात आले होते.
लिखित परीक्षेच्या निकालानंतर मुलाखत घेण्यासाठी लागलेला कालावधी एक महिन्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे एवढा उशीर का झाला, हेही संशयास्पद आहे.
अन्यथा उपोषण!
मुलाखतीला २० गुण होते. यासाठी विचारलेले प्रश्न हे पोलिस पाटील पदासाठीचे नव्हते. घरगुती प्रश्न विचारून चार मिनिटांत मुलाखती घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. लिखित परीक्षेचा निकाल घोषित करताना दाखविण्यात आलेली तत्परता मुलाखतीचा निकाल घोषित करताना दाखविली नाही. या प्रक्रियेत घोळ झाला नसेल असे प्रशासनाला म्हणावयाचे असेल तर त्यांनी लिखित परीक्षेचे व मुलाखतीचे गुण वेगवेगळे जाहीर करावेत, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.