Breaking News

‘पीडब्लूडी’ म्हणते पुलाचे बांधकाम निकृष्ट

पुणे-नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे खांब कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या पुलाचे काम निकृष्ट झाल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली असून आता नव्याने काम हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

 

दौंड शहरातून वाहणाऱ्या भीमा नदीवर दौंड शहर ते नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गार दरम्यान सुमारे २० कोटी रुपये खर्च करून हा पूल उभारण्यात येत आहे. सध्या दौंड येथून नदीपात्रातून होडीमार्गे गार व त्यापुढील गावांना जावे लागते. दौंड शहराला गारमार्गे नगर जिल्ह्यातील आर्वी, अजनूज आदी गावे या प्रस्तावित पुलामुळे जोडली जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाचे काम सुरू आहे. उन्हाळ्यामुळे धरणातील पाणी आटल्याने नदीपात्रात कमी पाणी आहे. या पुलाचे दोन मोठे खांब पाया कच्चा असल्याने कोसळले. या पुलाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.

 

नदीपात्रात पाणी नसताना पुलाच्या काही खांबांचे काँक्रिट पूर्णपणे निघून त्यातील लोखंडी सळ्या दिसत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तसेच हे निर्माणाधीन खांब एका बाजुला कलल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते. अखेर हे दोन खांब कोसळल्याची घटना घडली. नदीपात्रातील अन्य दोन खांबांच्या वरच्या बाजूला तडे गेले असून खालच्या बाजूचे काँक्रिट निघून गेले असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. खांब कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे अतुल चव्हाण आणि इतर अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी केली.

 

दौंड येथील भीमा नदीवर बांधण्यात येणारा पूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेतली. पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले होते. त्यामुळे तो पाडून टाकण्यात आला असून आता नव्याने हे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये रोष असल्याने तातडीने या प्रकाराची माहिती देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

बदल्यांसाठी किती पैसे दिले? मंत्री काय म्हणाले?

राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ …

तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या ‘पीडब्लूडी’ अधिकाऱ्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय तरुणीचे मागील ७ वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)अधिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *