चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विवेक फेडे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ चंद्रपूर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी समाज माध्यमावर मीडियावर सार्वत्रिक केला आहे. या व्हिडिओत अभियंता फेंडे कंत्राटदाराकडून २० हजार रुपयाचे पॉकेट घेत असल्याचा आरोप आपने केला आहे. सध्या या व्हिडिओने समाज माध्यमात धुमाकूळ घातला असून हा व्हिडिओ नेमका काढला कुणी याचा शोध जिल्हा परिषद कंत्राटदार असोसिएशनचे पदाधिकारी घेत आहे.
या व्हिडिओमध्ये फेंडे हे स्वतःच्या कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये २० हजार रुपये स्वीकारताना स्पष्टपणे दिसत आहेत असेही आपने येथे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. एवढेच नाही, तर पैसे स्वीकारल्यानंतर ते समोरील व्यक्तीला विचारतात किती आहे. यावर समोरील व्यक्ती सांगतो २० आहे. यानंतर फेंडे उर्वरित पैशांची मागणी करतात त्यावर समोरील व्यक्ती लवकरच उर्वरित पैसे आणतो असे आश्वासन देताना ऐकू येतो. ही घटना केवळ लाच स्वीकारण्यापुरती मर्यादित नाही तर उर्वरित लाचेची मागणी झाल्याचे ठोस पुरावे यातून समोर आले आहेत.
महत्वाचे म्हणजे, विवेक फेंडे यांना काही महिन्यांपूर्वीच भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे निलंबित करण्यात आले होते. परंतु स्थानिक सत्ताधारी आमदाराच्या राजकीय आशीर्वादामुळे ते पुन्हा सेवेत रुजू झाले असाही आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की भ्रष्टाचार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण असल्यामुळे त्यांचे मनोबल अधिक वाढत आहे का? जिल्हा परिषदेच्या कामकाजातील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेवर जनतेचा विश्वास राहणार कसा? आम आदमी पार्टी, चंद्रपूर जिल्हा या प्रकरणाचा तीव्र निषेध करते.
हा व्हिडिओ म्हणजे भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण असून, यामध्ये कायदेशीर पातळीवर तात्काळ कारवाई होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणी विवेक भेंडे यांना तात्काळ निलंबित करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) चौकशी सुरू करावी.या प्रकरणातील सर्व पुरावे जतन करून गुन्हा दाखल करण्यात यावा. राजकीय आश्रय घेऊन पुन्हा सेवेत आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी.
भ्रष्टाचारात दोषी आढळल्यास कठोरात कठोर शिक्षा देऊन जनतेसमोर आदर्श उदाहरण ठेवावे. जिल्हाधिकारी यांना वरील व्हिडिओ व्हाट्सअप द्वारे पाठविण्यात आला असून तक्रार नोंदवण्यात आलेली आहे असेही आपचे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी सांगितले.
“जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही कधीही सहन करणार नाही. भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे राजकीय लोक आता जनतेसमोर उघडे पडले आहेत. चंद्रपूर जिल्हा परिषद ही जनतेसाठी विकासकामे करण्यासाठी आहे, पण येथे अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी एकत्र येऊन जनतेच्या पैशांची लूट करत आहेत. हा व्हिडिओ त्याचाच पुरावा आहे. आता जनता याला माफ करणार नाही.” – मयुर राईकवार, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
जनतेला आवाहन
चंद्रपूरकरांनो भ्रष्टाचार हा आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. आपण सर्वांनी मिळून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने प्रश्न विचारला, जबाबदारीची मागणी केली, तरच खरी बदल घडेल.