Breaking News

दुरांतो,महानगरी,अमरावती रेल्वे एक्सप्रेसच्या वेळात बदल

Advertisements

मुंबई विभागातील मध्य रेल्वेने वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात व्यापक फेरबदल जाहीर केले आहेत. परिचालन कार्यक्षमतेत सुधारणा, उपनगरीय (लोकल) आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील समन्वय वाढवणे तसेच गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत.

Advertisements

सुधारित वेळापत्रक १३ एप्रिल आणि १४ एप्रिल पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. काही गाड्यांच्या आगमन-प्रस्थान वेळेत पाच ते ४५ मिनिटांपर्यंत बदल करण्यात आले असून, काही गाड्यांच्या मध्यंतरीच्या थांब्यांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. भुसावळमार्गे मुंबई–नागपूर–अमरावती मार्गावर धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठे बदल करण्यात आले आहेत.

Advertisements

त्यानुसार, मुंबईहून नागपूरकडे धावणारी १२२८९ क्रमांकाची दुरांतो एक्स्प्रेस आता रात्री ०७.५५ ऐवजी ०८.३५ वाजता सुटेल. त्यामुळे कामकाज संपवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. परतीच्या प्रवासात १२२९० क्रमांकाची गाडी मुंबईत सकाळी ०८.०५ ऐवजी ०७.५० वाजता म्हणजे लवकर पोहोचेल. सकाळच्या कार्यालयीन वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याने नियमित प्रवाशांना याचा फायदा होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अमरावती एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणारी १२१११ अमरावती एक्स्प्रेस आता ०८.०५ ऐवजी ०८.५० वाजता प्रस्थान करेल. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि इगतपुरी स्थानकांवरील वेळेत पाच ते १० मिनिटांची सुधारणा करण्यात आली आहे. या गाडीची वेळ बदलल्याने घाट विभागातील सिग्नलिंग आणि क्रॉसिंगची अडचण कमी होईल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.

महानगरी एक्स्प्रेसचा टर्मिनल बदलला

मुंबई–वाराणसी मार्गावरील २२१७७/२२१७८ क्रमांकाची महानगरी एक्स्प्रेस आता वाराणसीऐवजी बनारस रेल्वे स्थानकावरून सुटून तेथेच समाप्त होईल.२२१७७ मुंबई–बनारस एक्स्प्रेस मुंबईहून पहाटे ००.१५ वाजता प्रस्थान करेल. आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता पोहोचेल. २२१७८ बनारस-मुंबई एक्स्प्रेस बनारसहून सकाळी ०९.४५ वाजता सुटेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता पोहोचेल. वाराणसी शहरातील वेगवेगळ्या टर्मिनल्समधील गर्दी कमी करण्यासाठी आणि परिचालन अधिक सुलभ करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे समजते.

वेळापत्रक बदलण्याची तांत्रिक कारणे

मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकल आणि मेल–एक्सप्रेस गाड्यांमधील ‘हेडवे’ सुधारण्यासाठी काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. घाट विभागातील सिग्नलिंग प्रणालीचा अधिक कार्यक्षम वापर त्यामुळे होईल. क्रॉसिंग पॉइंट्सवरील विलंब कमी करण्यासाठी हे नियोजन आहे. जेणेकरून लांब पल्ल्याच्या गाड्यांचा सरासरी वेग वाढेल.

मुंबई विभागातील वाढत्या प्रवासी संख्येमुळे दररोज हजारो गाड्यांची हालचाल होते. या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात वेळोवेळी सुधारणा करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.एप्रिलपासून लागू होणाऱ्या या वेळापत्रक बदलामुळे लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होणार आहे. परिचालन सुलभता आणि वक्तशीरपणाच्या दृष्टीने हा निर्णय कितपत यशस्वी ठरतो, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

चलती ट्रेन-प्लेटफॉर्म के बीच फंसी महिला को RPF ने 7 सेकंड में बचाया 

चलती ट्रेन-प्लेटफॉर्म के बीच फंसी महिला को RPF ने 7 सेकंड में बचाया टेकचंद्र सनोडिया …

समृद्धी महामार्गावरील वाहतूक होणार बंद : कारण काय?

नागपूर- मुंबई समृद्धीमहामार्गाबाबत मोठी बातमी पुढे येत आहे. त्यानुसार २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *