वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी दलाला मार्फत पैसे घेऊन होत आहे, अशा तक्रारी कार्यालयास प्राप्त होत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांनी कोणत्याही दलाला मार्फत नोंदणी करु नये. दलाल पैसे घेऊन नोंदणी करुन देण्याचे अमिष दाखवित असल्यास पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा, व तशी लेखी तक्रार पुराव्यासह या कार्यालयास सादर करावी. तसेच यापुढे बांधकाम मजुरांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण यांनी केले आहे.
वर्धा जिल्हयात 30 जुलै पर्यंत एकुण 92 हजार 717 कामगारांची नोंदणी झाली असून 53 हजार 293 नोंदणीचे नुतणीकरण करण्यात आले आहे. जिल्हयात बांधकाम मजुराकरीता ऑनलाईन नोंदणीची, नुतनीकरणाची व विविध योजनेच्या लाभाचे अर्ज ऑनलाईन स्विकारण्याची कामे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, जिल्हा कामगार सुविधा केंद्र , प्लॅाट क्रमांक 41, वार्ड क्रमांक 10, घर क्रमांक 293 प्रतापनगर येथे करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व बांधकाम मजुरांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपली कामे प्रतापनगर कार्यालयातुन स्वत: जावुन करुन घ्यावीत. कोणीही बाहेरील स्वयंघोषित दलालाकडून आपली कामे करुन घेऊ नये किंवा भुलथापांना बळी पडुन आपली फसवणुक करुन घेऊ नये, त्याकरीता कार्यालय जबाबदार राहणर नाही असे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी पी.डी चव्हाण यांनी कळविले आले.