अखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री सुरू!
– ग्राहकांनी केेली गर्दी
चंद्रपूर,
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवून मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या पूर्ववत चालू करण्याबाबतच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार सोमवार, 5 जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्यक्षात अधिकृतरित्या दारूविक्री सुरू झाली आहे. सध्या 1 दारू दुकान, 6 बिअर दुकान, 65 बिअर बार आणि 26 देशी दारू दुकानांना परवानगी देण्यात आली असून, त्यापैकी काही सुरू झाले आहेत. उर्वरित दुकाने क्रमाक्रमाने सुरू होणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील 1 एप्रिल 2015 पासून बंद असलेल्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुन:प्रदान करून 2021-22 करिता नुतनीकरण करून देण्यात आले आहे. 31 मार्च 2015 पर्यंत नुतनीकृत असलेल्या व चंद्रपूर जिल्ह्यातून स्थलांतरित न झालेल्या अशा अनुज्ञप्तीधारकांनी अर्ज केल्यास आवश्यक शुल्क आकारून, चौकशी करून, कागदपत्रांची पडताळणी करून अशा अनुज्ञप्ता अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून पुन:प्रदान करून नुतनीकरणाचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेस जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेली होती. त्यानुसार 2 जुलैपासून एकूण 98 विविध प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या पूर्ववत चालू करून देण्याबाबत आदेश देण्यात आले.
5 जुलैपर्यंत एकूण 303 अनुज्ञप्त्यांसंदर्भात नुतनीकरण करून देण्याबाबत अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 280 प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहेत. तर चौकशी पूर्ण होऊन पुढील निर्णयासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयात एकूण 168 अहवाल प्राप्त झाले. यात 70 प्रकरणावर निर्णय घेऊन अनुज्ञप्त्या पुन:प्रदान करण्याबाबत सोमवारी आदेश देण्यात आले. तसेच ही प्रक्रिया यापुढेही जलद गतीने चालू ठेवण्यात येईल व प्राप्त अर्जावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांनी दिली आहे.