विश्व भारत ऑनलाईन :
श्रावण, गणेशोत्सवात काही दिवस मांसाहाराला विश्रांती दिल्यानंतर आता पुन्हा एकदा खवय्यांची पावलं चिकन, मटण, मासे आणि तत्सम पदार्थांकडे वळली आहेत. पण, काही घरांमध्ये मात्र अद्यापही चिकन आणि मटणवर ताव मारला जात नाही. ठरतोय तो म्हणजे सध्या सुरु असणारा पितृ पंधरवडा.
पितृपक्ष सुरु झाल्यामुळं पितरांच्या नावानं अनेक घरांमध्ये घास काढण्याची परंपरा आहे. यामध्ये बऱ्याच भाज्यांचा वापर केला जातो. पण, आता याच भाज्या खिशाला जोरदार फटका देऊ लागल्या आहेत. त्याही इतक्या, की चिकन खाणाऱ्यांना आपण या खर्चातून वाचलो,असंच वाटू लागलं आहे.
भाजीपाला महागला…
पितृपक्ष सुरू होताच भाजीपाला महागल्याचं स्पष्ट होत आहे. ढेमसे, वाटाण्याचे दरही कमालीचे वाढले आहेत. गणेशोत्सवादरम्यान भाजीपाला स्वस्त झाला होता. पितृपक्ष सुरू झाल्यावर भाव पुन्हा वाढू लागले आहेत. फरसबी, गवार, टोमॅटो यांचे दरही वाढले आहेत. पालेभाज्यांचे दर कमालीचे वाढले. पुढील महिनाभर भाज्यांचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.
कुतूहलाची बाब म्हणजे शेवग्याच्या शेंगांच्या दरांनी किलोमागे 200 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. एक किलो चिकनही त्याहून स्वस्त आहे, त्यामुळं आता जर तुम्ही चिकन खरेदी करण्यासाठी निघालाच असाल तर तुमची पावलं योग्य दिशेनं पडत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण, एकतर जीभेचे चोचलेही पुरवले जातील आणि भाजीपाल्यासाठी तुम्हाला अवाजवी खर्चही करावा लागणार नाहीये.