विश्व भारत ऑनलाईन :
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मांदळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. लोमेश गुलाब चौधरी असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. वन विभागाने मांदळवाडी, ढगेस्थळ येथे तातडीने पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घटनाक्रम असा…
मांदळेवाडी येथील विठ्ठल गेनुजी ढगे यांच्या शेतात काम करणारे लोमेश गुलाबराव चौधरी (वय 32) हे शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढगे स्थळ येथे दुचाकीने गाईंसाठी गवत आणण्यासाठी शेतामध्ये जात हाेते. यावेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. चौधरी हे अचानक झालेल्या हल्ल्याने गाडीवरून खाली पाण्यात पडले. त्यानंतर बिबट्या तेथून उसाच्या शेतात पळून गेला. चौधरी यांच्या डाव्या डोळ्याखाली दोन जखमा व नाकाखाली एक जखम झाली आहे, तसेच त्यांच्या डाव्या खांद्याला जखम झाली आहे. लोमेश चौधरी यांच्यावर लगेचच लोणी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक करून त्यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.