विश्व भारत ऑनलाईन :
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, कन्नड व बीडच्या गेवराई तालुक्यात भगर खाल्ल्याने १५६ जणांना विषबाधा झाली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. वैजापूर तालुक्यात विषबाधा झालेल्यांची संख्या ११८, कन्नडमध्ये १२ तर गेवराई तालुक्यातील २६ जणांवर उपचार सुरू आहेत.
वैजापुरात सोमवारी (२६ सप्टेंबर) रात्री ९ ते मंगळवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या गावातून बाधित रुग्णांच्या संख्येत सकाळपर्यंत वाढ झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय विभागातील सूत्रांनी दिली. मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने वैजापुरातील सिद्ध अलंकार ट्रेडर्सवर कारवाई करत १३ हजार १२० रुपयांची ८२ किलो निकृष्ट भगर जप्त केली. दरम्यान, वैजापुरात सर्वांना सरकारी व खासगी रुग्णालयात भरती केले. शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ३६, तसेच विविध आठ खासगी रुग्णालयांत ७० जणांवर उपचार सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन तारपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास डुकरे उपचार करत आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ.तारपे म्हणाले.
भगर घेताना ही घ्यावी काळजी
✳️पॅकिंगच्या भगरीपेक्षा खुली भगर स्वस्त मिळत असल्याने जास्त खरेदी. त्यामुळे विषबाधेचा प्रकार घडला
भगर किंवा कुठल्याही पॅकिंगच्या वस्तू अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाकडून प्रमाणित असतात.
✳️पॅकिंगची भगर घेतल्यास त्यावर उत्पादन दिनांक व एक्स्पायरी डेट असते. त्यामुळे ती सुरक्षित.
✳️खाद्यपदार्थ, शिळे अन्न विक्रीसाठी प्रशासनाने निर्बंध घातलेले आहेत. पॅकिंगच्याच वस्तू घ्याव्यात, असे अन्नसुरक्षा अधिकारी म्हणाल्या.