विश्व भारत ऑनलाईन :
सध्या खरी शिवसेना कोणाची? यावर चांगलाच वाद सुरु आहे. यावर निवडणूक आयोगात जेव्हा सुनावणी सुरू होईल, तेव्हा शिवसेना संघटनेत दोन तृतीयांश फूट असल्याचे दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ही कायदेशीर लढाई लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 130 बड्या वकिलांची फौज नेमली आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होणार आहे.
दिग्गज वकील कोण?
130 वकिलांच्या फौजेत मुकुल रोहतगी, नीरज कौल, अरविंद दातार, माजी महाधिवक्ता डायरस खंबाटा यांसारख्या ज्येष्ठ वरिष्ठ वकिलांसह सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उदय लळित यांचे पुत्र वकिल श्रीयांश लळित यांनाही ठेवण्यात आले आहे.
प्रतिज्ञापत्रे ठरणार महत्त्वाची
विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि तेथील पदाधिकाऱ्यांकडून घेतलेली प्रतिज्ञापत्रे आयोगासमोर सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्रातूनही गटप्रमुखांपासून नेतेपदापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे सादर केली जाणार आहेत. यावरून शिवसेना संघटनेतील दोन तृतीयांशहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सिद्ध होईल. या प्रकाराची माहिती शिवसेना भवनशी संबंधित एका विश्वसनीय सूत्राने दिली.
रणनीती काय असेल?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह देण्यास निवडणूक आयोग नकार देऊ शकतो. या आणीबाणीला तोंड देण्यासाठी शिंदे गटाने मित्रपक्ष भाजपच्या सहकार्याने रणनीती आखण्यात आली आहे.
पीआर-सोशल मीडीयाचा वापर
दही-हंडी उत्सव आणि गणेशोत्सवादरम्यान पीआर एजन्सीचा वापर करून दोन्ही पक्षांचे ब्रँडिंग करण्यात आले. अशा व्यावसायिक लोकांचा वापर होणार आहे. याशिवाय शिंदे गट आणि भाजप हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचा वापर करणार आहेत.
प्रोफेशनल लोकांची मदत
मुख्यमंत्री शिंदे गटाच्या या राजकीय खेळीला शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे उत्तर देणार आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी सांगितले की, पक्षाच्या वतीने सोशल मीडिया हाताळणाऱ्या तरुण शिवसैनिकांची टीम शिवसेना भवनात तैनात करण्यात आली आहे. गरज भासल्यास प्रोफेशनल लोकांचीही मदत घेतली जाणार आहे.
‘जिथे गाव, तेथे शाखा’
वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेची टीम अल्पावधीत पक्षाचे निवडणूक चिन्ह लोकांमध्ये लोकप्रिय करण्यात शंभर टक्के यशस्वी ठरेल. ग्रामीण भागात ‘जिथे गाव,तेथे शाखा’ शिवसेनाप्रमुखांची ही खूप जुनी संकल्पना पक्षासाठी जीवदान देणारी ठरणार आहे. जिथे मोबाईल, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाची पोहोच नाही, तिथे शिवसेनेचे गटप्रमुख आणि शाखाप्रमुख पक्षाचे निवडणूक चिन्ह
ठाकरे गट आयोगासमोर दाद मागणार?
शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यात यावे. अशी विनंती उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ठाकरे गट आयोगासमोर लवकर सुनावणीची मागणी करेल, अशी शक्यता कमीच दिसते. याउलट दसरा मेळाव्यानंतर शिंदे गट निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करू शकतो. कारण आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने येण्याची शक्यता शिंदे गटाला वाटत आहे.
धनुष्यबाण-बाळासाहेब ठाकरेंचा आवाज वापरणार
शिवाजी पार्क आणि बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या वेगवेगळ्या दसरा मेळाव्यात दोन गोष्टी कॉमन होणार आहेत. दोन्ही ठिकाणी रॅलीच्या मुख्य मंचावर धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा वापर होणार आहे. याशिवाय शिवसेनाप्रमुख स्व. बाळ ठाकरेंचा आवाजाचा वापर ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गट करणार आहेत.
बाळसाहेबांवर फक्त आमचा अधिकार-ठाकरे
ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांना बाळ ठाकरे यांचे फोटो वापरण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की, ठाकरे यांचे पुत्र असल्याने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो राजकीय व्यासपीठावर वापरण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे.