विश्व भारत ऑनलाईन :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच काही आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
मागील 15 दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन दोनदा भेट घेतली होती. याचवेळी नार्वेकर हे शिवसेनेमधून फुटणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवसेना कोणाची याबाबत संघर्ष तर सुरू असताना उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे आता शिंदे गटात जाणार असल्याची धक्कादायक माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल एका सार्वजनिक कार्यक्रमात केली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.