राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र,मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे एक महिन्यापासून जिल्हा उपनिबंधकांनी आदेश डावलून प्रशासकाची नेमणूक केली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हा उपनिबंधकांविरोधात पुराव्यासह सहकार विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता सहकार विभागाकडून जिल्हा उपनिबंधकावर काय कारवाई करण्यात येते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. परभणीच्या मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक करावी, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीचे जिल्हा उपनिबंधक यांना एका महिन्यापूर्वी दिले होते.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी एका महिन्यापूर्वी आदेश देऊनही जिल्हा उपनिबंधक यांनी आदेशावर कार्यवाही केलेली नाही. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक केली नाही. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या लक्षात आला. यानंतर त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेऊन सुनावलं होतं. बाजार समितीवर तात्काळ प्रशासकाची नेमणूक करावी,अशा सूचना त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिल्या.