एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. केवळ वेदनाच नव्हते तर उपचारांसाठी होणारा खर्च देखील जास्त असून तो प्रत्येकालाच परवडत नाही. मात्र आता या रूग्णांसाठी एक दिलासादायक आणि चांगली बातमी आहे.
ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग आता अवघ्या हजार रुपयांत बरा होणार आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत महत्त्वाचं संशोधन केलंय.
संशोधनाच्या अहवालाअंती योग आणि व्यायाम केल्याने स्तनांच्या कर्करुग्णांत मृत्युदर 15 टक्क्यांनी घटल्याचं देखील समोर आलंय. यामुळे दरवर्षी सुमारे 4 हजार रुग्णांचा जीव वाचणं शक्य होईल. टाटा रुग्णालयाच्या या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलीये
ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर या अत्यंत गंभीर प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये 50 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांमध्ये कार्बोप्लॅटिन औषधाने कॅन्सर बरा होण्याचे प्रमाण वाढलंय. मुख्य म्हणजे यापूर्वी, सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधाविषयी महत्त्वाचा निर्णायक पुरावा उपलब्ध झाला नव्हता.
टाटा रुग्णालयामध्ये 2010 ते 2022 या काळामध्ये नोंदणी झालेल्यांपैकी एकूण 850 रुग्णांचा या संशोधनामध्ये सहभाग होता. या रुग्णांनी सातत्याने दोन वर्षे योग तसंच व्यायाम केल्यामुळे आरोग्य सुदृढ होण्यास मदत झाली. परिणामी याची सकारात्मक बाब दिसून आली आहे.
टाटा मेमोरिअल रुग्णालयातील या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आलीये. अमेरिकेतील सॅन अँटेनियो ब्रेस्ट कॅन्सर सिम्पोजियम या कॉन्फरन्समध्ये टाटा रुग्णालयाच्या डॉ. नीता नायर यांनी हे संशोधन प्रेझेंट केल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
संशोधनातील निष्कर्ष
*स्तनांचा कॅन्सर असलेल्यांवर उपचारांबरोबरच योग आणि व्यायामामुळे आयुर्मान 66 वरून 74 टक्क्यांपर्यंत.
*भावनिक तसंच मानसिक आरोग्यामध्ये सकारात्मक बदल.
*केमोथेरपीच्या तुलनेत दुष्परिणाम कमी होतात.
*यामुळे वेदनांचं प्रमाणही कमी होतं. त्याचप्रमाणे रोग प्रतिकारकशक्तीत सुधारणा होते.