✍️मोहन कारेमोरे
नागपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाला सध्यातरी बऱ्यापैकी ब्रेक लागला आहे. याचे कारण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध भागात सीसीटीव्हीयुक्त 42 रेती तपासणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. यामुळे रेती तस्करी करणाऱ्यावर काही प्रमाणात अंकुश लागला आहे.
नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अचानक काही रेती तपासणी चौकीला पहाटे-पहाटे भेटी दिल्याची माहिती आहे. यात मुख्यत्वे नागपूरच्या आसपासचा परिसर आहे. कामठी, मौदा भागातील चौक्यांना भेटी दिल्याचे समजते. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही धाबे दाणाणले आहेत.
तलाठी हजर, अन्य कर्मचारी गायब
रेती तस्करी रोखण्याची जबाबदारी ही महसूल, ग्रामविकास, पोलीस, परिवहन, वन विभागाची आहे. यात मुख्यत्वे महसूलवरच अधिक ताशेरे ओढले जाते. त्यातच तलाठी अर्थातच महसूलचा कणाच. या रेती चौकीवर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल आणि पोलीस असायला पाहिजेत. मात्र, फक्त तलाठी आणि कोतवालच कर्तव्य बजावत आहे. अन्य विभागाचे कर्मचारी अनुपस्थित असतात. तलाठी 12-12 तास चौकीवर असल्याने महसूलच्या अन्य कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ईतर विभागातील कर्मचारी कधी गांभीर्य दाखविणार? की निव्वळ तलाठी मंडळींनाच कारवाईचा हिसका दाखवायचा? असा प्रश्न चर्चीला जात आहे. याकडेही कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित होतोय.