ऐन रब्बी हंगामात पूर्व विदर्भात(भंडारा, तुमसर, गोंदिया) युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रब्बीच्या उत्पादनात घट होऊ शकते. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.अति पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहेत. असे असताना खरिपातील नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नरत आहेत.
मात्र, ही आशाही आता पूर्णतः मावळताना दिसत आहे. जानेवारीमध्येच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी दुकानामध्ये युरिया मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. ग्रामीण भागातील कृषी दुकानांमध्ये खत मिळत नसल्यामुळे शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत. मात्र, तेथेसुद्धा खत उपलब्ध नसल्याचे कृषी दुकानदार शेतकऱ्यांना सांगत आहेत. काही कृषी दुकानदारांकडे युरिया खत उपलब्ध असताना देखील खताचा तुटवडा दाखवून शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम घेण्यात येत आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसत असून उत्पन्नावर परिणाम होत आहे. कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन खत उपलब्ध करून देण्याचे मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.