कर्करोग आणि हृदयविकार हे गंभीर स्वरूपाचे आणि जीवघेणे आजार आहेत. पहिल्या टप्प्यात कॅन्सरचं निदान झालं तर संबंधित रुग्णाला उपचारातून योग्य दिलासा मिळू शकतो. हृदयविकार असलेल्या रुग्णालाही आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. जगभरात दर वर्षी या दोन्ही विकारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
कॅन्सर आणि हृदयविकारावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात; पण हे विकार कसे रोखता येतील याविषयी ठोस माहितीचा अभाव आहे. कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी किंवा संसर्ग झाला तरी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये यासाठी लशीची निर्मिती केली गेली. या लशीचा कोट्यवधी नागरिकांना फायदा झाला. आता भविष्यात कॅन्सर आणि हृदयविकार रोखण्यासाठी अशाच प्रकारची लस तयार होऊ शकते.
कॅन्सर आणि हृदयरुग्णांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या आजारांवर लवकरच लस बनवता येईल, असा दावा अमेरिकी तज्ज्ञांनी केला आहे. या दशकाच्या अखेरीस जगभरातले कॅन्सर आणि हृदयविकार असलेले रुग्ण लशीद्वारे बरे होऊ शकतील. वास्तविक, कोरोना महामारीदरम्यान लस संशोधन झाल्यामुळे संशोधकांना कॅन्सर आणि हृदयविकारावर लस शोधणं सोपं झालं आहे. नागरिक लवकरच कॅन्सर, हृदयविकार व रक्तवाहिन्यांसंबंधी, तसंच ऑटोइम्युन विकार आणि अन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी लस घेऊ शकतील.