विदर्भ क्रिकेट असोसिएशन मध्ये विविध पदांची जबाबदारी सांभाळलेले आणि नुकतेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्युरेटर म्हणून नियुक्ती झालेल्या प्रवीण हिनगाणीकर यांच्या वाहनाला आज दुपारी तीन वाजता अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर लासुरा फाट्या जवळ झालेल्या या अपघातामध्ये प्रवीण यांची पत्नी जागीच ठार झाल्या आहेत तर प्रवीण हे गंभीर जखमी झालेले आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या क्रेटा गाडीचा चुराडा झाला आहे.प्रवीण हिनगाणीकर हे दांपत्य आज पुण्याहून नागपूरकडे जात होते. त्यादरम्यान समृद्धी महामार्गावर पुलाखाली सावलीत उभ्या असलेल्या एका कंटेनरला प्रवीण यांच्या वाहनाने जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पत्नीचे मुंडके शरीरा वेगळे झाले आहे. प्रवीण स्वतः हे वाहन चालवत होते, यांच्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे.
यामध्ये विशेष बाब अशी की अपघात झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच जालना शहरात ओम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये परिचारक म्हणून असलेले अलेक जेकब आणि त्यांची पत्नी श्वेता जेकब ज्या सध्या महिला स्त्री रुग्णालयात परिचर्या म्हणून कार्यरत आहेत हे दोघे अकोल्याकडे विवाहा निमित्त जात होते. त्यांनी हा अपघात पाहिल्यानंतर लगेच वाहन थांबून प्रवीण यांना प्रथमोपचार केले इतर सर्वजण चित्रीकरण आणि फोटो काढण्यात मग्न असताना आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या या जेकब दाम्पत्याने खऱ्या अर्थाने आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या मदतीला वाहनचालक त्रिंबक हिवाळे हे देखील होते.