ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. अशाच एका रस्त्याने अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील एका आठ महिन्याच्या गर्भवतीचा जीव घेतला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. रेडवा येथील संजीवनी रोहित पवार (२४) ही महिला तिच्या पतीसोबत शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मोटार सायकलने बार्शीटाकली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणीसाठी जात होती.
बार्शीटाकळीजवळ अमराई परिसरात रस्त्यावरील एका खड्ड्यातून त्यांची दुचाकी उसळली. दोघे पती-पत्नी खाली पडले. गर्भवती महिलेला डोक्याला मार लागला. जखमीस लगेच बार्शीटाकळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
एकुलती एक बहीण, भावांनी फोडला हंबरडा महिला रेडवा येथील असून तिचे माहेर चिखलागड तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशीम असल्याची माहिती आहे. एकुलती एक बहिणीच्या मृत्यूची वार्ता कळताच दोन भावांनी हंबरडा फोडला. नातेवाइकांकडून घटनेबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. पिंजर-बार्शीटाकळी मार्गावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामध्ये यापूर्वी अनेक मोटरसायकली उसळून अपघात घडले. लोक जखमी झाले. याबाबत प्रशासनास फोटो पाठवून सूचना देण्यात आल्या होत्या, तरीसुद्धा त्यांनी कोणती दखल घेतली नाही. आता तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन पिंजर- बार्शीटाकळी मार्गावरील खड्डे ताबडतोब दुरुस्त करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.