चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. रात्री परिवार झोपेत असताना वाघाने हल्ला चढविला. मात्र वाघाशी झुंज देत कुटुंबाने प्राण वाचविले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी शेत शिवारात घडली.
नांदगाव येथील हे मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घोसरी येथील शेत शिवारात राहुटीला होते. रात्री झोपेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने वेणूबाई दुर्किवार या महिलेवर हल्ला केला. बाजूलाच झोपेत असलेल्या पती सुरेश दूरकीवार व मुलगा पंकज दूरकीवार यांनी महिलेला वाचवण्यासाठी वाघाशी झुंज दिली. या प्रतिकारात कुटुंबातील तिघेही जखमी झाले.
जखमी वाघ दिसला
विशेष म्हणजे सध्या याच परिसरात एक वाघ जखमी अवस्थेत फिरताना आढळून आला आहे. त्यामुळे मेंढपाळाच्या कुटुंबियांनी केलेल्या प्रतिकारात हा वाघ जखमी झाला का, अशी शंका निर्माण झाली आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.