महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात १८६६.४० कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत हस्तांतरीत केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २७) हा निधी जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी, केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली असून, या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति हप्ता २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाकाठी ६ हजार रुपयांचा निधी दिला जातो.
पीएम किसान अंतर्गत देय असलेल्या चौदाव्या हप्त्याचा (एप्रिल, २०२३ ते जुलै, २०२३) लाभ देशातील लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केल्याने खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा खरेदीसाठी ही रक्कम निश्चितच उपयुक्त ठरेल. तसेच कृषी उत्पादन वाढीला चालनाही मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये योजना सुरू झाल्यापासून ११०.५३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना २३७३१.८१ कोटींचा लाभ हस्तांतरीत करण्यात आला आहे.