स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. त्यानुसार नियोजन आहे. परीक्षा घेण्यासाठी टी. सी. एस आणि आय.बी.पी.एस या दोन एजन्सीची निवड करण्यात आली होती. पण महाराष्ट्रात जवळ-जवळ प्रत्येक नोकर भरतीचा पेपर फोडण्यात येत असून याद्वारे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. तलाठी, पोलिस, वन भरती परिक्षा पेपर फुटलेला असल्याने या परीक्षा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे पदाधिकारी महेश घरबुडे आणि निलेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गायकवाड म्हणाले, मुंबई पोलिस भरतीत 8000 पेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. परीक्षेत घोटाळा होऊ शकतो याची कल्पना आम्ही परीक्षेपूर्वीच मुंबई पोलिसांना दिली होती, मात्र तरीही योग्य ती खबरदारी न घेतल्याने मुंबई पोलिस भरतीचा पेपर घोटाळेबाजांनी फोडला. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला फुटलेला पेपर मिळाल्यानंतर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यानुसार दहिसर पोलीस स्थानकात पेपरफुटीची एफ आय आर दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याचा सखोल तपास सुरू केला आणि 100 हून अधिक आरोपींविरुद्ध पुरावे सिद्ध केले आहेत. अद्याप तपास सुरूच आहे तरीही उमेदवारांना मेडिकल नंतर नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. घोटाळेबाजांनी हाय टेक कॉपी करताना इतरांचे सिम कार्ड वापरले असल्यास अशा आरोपींना पकडणे कठीण झाले आहेत.
वन विभागाच्या २,३१८ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. वन विभाग परीक्षेत काही टोळ्या गैरप्रकार करू शकतात याची माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला मिळाली होती त्यानुसार आम्ही संभाजीनगर पोलिसांना याबाबत सूचित केलं होत. परीक्षेच्या दिवशी संभाजीनगर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत काही आरोपी पेपर फोडताना आढळून आले. आरोपींकडे प्रश्नांचे १११ फोटो सापडले असून परीक्षेदरम्यान पेपर फुटल्याचे सिध्द झालं आहे. वन विभागाच्या परीक्षेत अनेक एफ आय आर दाखल झाल्या असून, यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या टोळ्यांनी सदर पेपर नक्की किती आरोपींपर्यंत पोचवीला याचा तपास अजून सुरूच आहे. तलाठी परीक्षेत ४,६४४ तलाठी पदांसाठी दि.१७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान एकूण ५७ शिफ्ट मध्ये टी सी एस कंपनीमार्फत पेपर घेण्यात आले होते. तलाठी परीक्षेसाठी १०,०४१,७१३ उमेदवारांनी अर्ज केले त्यापैकी ८,६४,९६० उमेदवार परीक्षेस हजर होते. तलाठी परीक्षेत अत्याधुनिक साधनाचा वापर करून पेपर फोडल्याचा सारखे अनेक गैरप्रकार उघड झाले.