रेल्वे प्रवासासाठी कन्फर्म तिकीट मिळणे अवघड होते. पण दलालांकडे मात्र कन्फर्म तिकीट हमखास मिळते. असे कसे काय घडते? असा प्रश्न नेहमी विचारला जातो.
दलालांकडून तिकीटांचा काळाबाजार केला जात असून प्रवाशांची लुट केली जात असल्याची तक्रार रेल्वे सुरक्षा दलाकडे झाली. त्यानंतर त्यांनी मोहीम उघडली. मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित डब्यात तिकीट मिळण्याची प्रवाशांना अडचण होते. तिकीट खिडकीवरून किंवा ऑनलाईन दोन्ही ठिकाणी कन्फर्म तिकीट मिळणे कठिण असते.
पण, दलालांकडून चढ्या दराने तिकीट खरेदी केल्यास कन्फर्म तिकीट उपलब्ध होते. या प्रकरणाचा शोध आरपीएफने लावला आणि मध्य रेल्वेने मुंबई, पुणे आणि नागपूरसह पाच विभागांत एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तब्बल २६९ गुन्हे दाखल करून प्रवाशांची लूट करणाऱ्या ३१७ दलालांना अटक केली. गेल्या सहा महिन्यांत नागपूर विभागात ३६ दलालांना शोधून त्यांच्याकडून तिकिटे जप्त करण्यात आली.