नागपुरातील वादग्रस्त भाजप नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शहरातील कांबळे चौक परिसरात ‘नाइटपार्टी’त झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला. नागपूर पोलिसांनी सांगितले की अर्जुन हा व्हीआर मॉलमधील एजन्ट जॅक येथे पार्टी साजरी करण्यासाठी मित्रांसह आला होता. त्यावेळी कुंभार टोलीतील काहींनी त्याच्यावर हल्ला केला.
पार्टीनंतर अर्जुन, विजय हजारे आणि आनंद शाह यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. तरुणांमध्ये काही कारणावरून वाद झाल्यानंतर ही घटना घडली. हल्लेखोरांनी यादव आणि त्याच्या मित्रांच्या वाहनांचा पाठलाग केला. त्यानंतर कांबळे चौकात त्यांचे वाहन अडविले. तिघांनाही वाहनातून बाहेर खेचत हल्ला करण्यात आला. यादव आणि हजारेला धंतोलीतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला व हाडांना दुखापत झाली आहे. शाह याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीव महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन याचे वडिल ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव हे संघटित बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष होते. 2017 मध्ये दिवाळीत अजनी भागात फटाके फोडण्यावरून मुन्ना यादव यांचा मोठा वाद झाला होता. हे प्रकरण कालांतराने उच्च न्यायालयापर्यंत गेले होते. त्यावेळी हायकोर्टाने राज्याचे गृहसचिव, नागपूर शहर पोलिस आयुक्त व धंतोली पोलिसांना नोटीस बजावली होती. यादव हे भाजपचे नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आहेत.
मुन्ना यादव तीनदा नगरसेवकही होते. दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमिनी बळकावणे, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, अॅट्रॉसिटी अशा अनेक आरोपांमुळे मुन्ना यादव हे नाव चर्चेत आहे. 2009 पासून यादव यांच्याविरोधात नागपुरात अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची संख्या दहाच्या आसपास असल्याचे शपथपत्र पोलिसांनीच न्यायालयात दाखल केले होते. मुन्ना यादव यांचे दोन्ही मुले करण आणि अर्जुन यांच्या विरोधातही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.