महाराष्ट्रात पाच जानेवारीनंतर हलका पाऊस? अंदाज
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगाल उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या अखेरीस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची वाटचाल उत्तर दिशेने सुरू आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून राज्यात बाष्पयुक्त वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी, पाच जानेवारीनंतर पुढील दोन-तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात बाष्पयुक्त वारे येऊन ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार दिवस किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. हलक्या पावसामुळे दिवसा गारवा जाणविण्याची शक्यता आहे.दरम्यान, सोमवारी गोंदिया येथे राज्यात सर्वांत कमी १२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.विदर्भात पाऊस येणार किंवा नाही, ही बाब हवामान खात्याने स्पष्ट केलेली नाही.