माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वन्यजीव प्रेमींसह सामान्य लोकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. एक तरुण माकडाला झाडावर उलटे टांगून अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही जीवाचा थरकाप उडावा! हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भाषेवरून तो विदर्भातील असावा, असे वाटत आहे. वन विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
माकडांमुळे शेतात अनेकदा नुकसान होते. माकडांपासून पिकांचा बचाव व्हावा म्हणून शेतकरी विविध क्लुपत्या योजतात. मात्र या व्हिडीओमध्ये दोन तरुण दिसत असून, त्यांनी माकडाला दोरीने झाडाला उलटे टांगले आहे. एक तरुण शिव्यांची लाखोळी वाहत माकडला चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करत आहे. या मारहाणीमुळे माकड रक्तबंबाळ झाल्याचे दिसते. त्यानंतर हा तरुण बुक्क्यांनी माकडाच्या तोंडावर मारहाण करतो. त्याच्यासोबत उभा असलेला एक मित्र त्याला आता ‘खेटराने मार’ असे सुचवतो, तेव्हा हा तरुण माकडाला चपलेने मारहाण करतो. या मारहाणीमुळे माकड मृतप्राय झाल्याचे दिसते. हा प्रकार सुरू असताना हे तरुण निदर्यीपणे हसतात, शिव्या घालतात. यावेळी एक तरुण माकडास मारहाण करताना, एक उभा राहून बघताना तर एकजण चित्रिकरण करत असल्याचे दिसते.
हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप समोर आले नसले तरी व्हिडीओतील भाषेवरून तो विदर्भातील असल्याचे भासत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त् केला आहे. यवतमाळ येथील ओलावा पशुप्रेमी फाऊंडेशनचे सुमेध कापसे यांनी हा प्रकार मानवजातीला काळीमा फासणारा असल्याचे म्हटले आहे. इतक्या अमानवीय पद्धतीने मुक्या प्राण्याला मारहाण करणाऱ्यासह त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात वन्यजीव कायद्यान्वये कारवाईची मागणी कापसे यांनी केली आहे.
तर पाच वर्षांचा कारावास
भारतीय दंड संहिता कलम ४२९ आणि प्राण्यांच्या क्रुरतेला प्रतिबंध करणारा अधिनियम १९६० चे कलम ११ नुसार, प्राण्यांशी क्रूर वर्तन केल्याचे सिद्ध झाल्यास पाच वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या व्हिडीओतील तरुण माकडाला अत्यंत क्रूर व निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या तरुणावर सदर कायद्यांतर्गत कारवाईची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.