उन्हाळ्यात सध्याच्या उच्च तापमानामुळे हृदयावर ताण येण्याची आणि त्यामुळे काही लोकांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक होण्याचीही शक्यता असते. यामध्ये प्रामुख्याने वृद्ध व्यक्ती, उच्च रक्तदाब असलेले, तसेच ज्यांना हृदयविकाराची समस्या आहे अशा व्यक्तींचा समावेश असतो.
हृदय रक्ताभिसरणाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे आपल्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करते. तापमानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे हृदयावर ताण येतो. कारण- ते शरीरातील उष्णता स्थिर करण्याचा प्रयत्न करते आणि त्या बदल्यात शरीरात इतर आरोग्य समस्या उदभवतात.
उच्च रक्तदाबामुळे हृदयाचे ठोके वाढतात?
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुमच्या सभोवतालचे तापमान झपाट्याने वाढते, तेव्हा शरीर स्वतःला त्वरित समायोजित करण्याची क्षमता गमावते. जर तुमच्या सभोवतालची हवा तुमच्या शरीरापेक्षा थंड असेल, तर तुम्ही हवेत उष्णता सहज पसरवता. परंतु, उच्च तापमानात हृदयाला असे करण्यासाठी अतिरिक्त जोर द्यावा लागतो. त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांसोबतच रक्तदाबदेखील वाढतो.
रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार आणि उष्णता
तज्ज्ञांच्या मते, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, ते बऱ्याचदा लघवीचे प्रमाण वाढावे यासाठी औषध आणि बीटा ब्लॉकर्स घेतात; जेणेकरून त्यांची पातळी नियंत्रणात राहते. लघवीचे प्रमाण वाढल्याने शरीरातील निर्जलीकरण वाढू शकते; ज्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन आणि कमी कॅल्शियम या समस्या उदभवू शकतात. त्यामुळे हृदयाच्या विद्युत आवेगांमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
बीटा ब्लॉकर्समुळे हृदयाचे ठोके कमी होतात. उष्णतेमुळे हृदयाचे ठोके मंद गतीने चालतात. जर तुम्ही देशाच्या किनारपट्टीच्या भागात असाल आणि जर त्या ठिकाणी आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर घाम येणे आणि बाष्पीभवन यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांवरही ताण पडतो.
घाम शरीरातील उष्णता कमी करताना, सोडियम आणि पोटॅशियम यांसारखी प्रमुख खनिजे आणि स्नायूंच्या आकुंचन, मज्जातंतूंचे संक्रमण व पाण्याचे संतुलन यांसाठी आवश्यक असलेली इतर खनिजे कमी करतो.
जेव्हा हवेत पाण्याची वाफ जास्त असते, तेव्हा बाष्पीभवन वाढविणे कठीण होते आणि हृदय शरीराला तीव्र गतीने थंड करण्यासाठी खूप वेगाने काम करते.
या संदर्भात स्वतः:ची काळजी कशी घ्यावी हे स्पष्ट करताना तज्ज्ञ सांगतात की, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार या सर्व आरोग्य समस्या हायड्रेशनने दूर केल्या जाऊ शकतात. तुम्हाला तहान लागली नसतानाही तुम्ही दिवसातून चार ते सहा लिटर पाणी प्यायला हवे. त्यामध्ये पाण्यासोबतच तुम्ही ज्यूसचादेखील समावेश करू शकता. जर तुम्हाला मधुमेह किंवा स्ट्रोक झाला असेल, तर ते डिहायड्रेशनसाठी मेंदूची प्रतिक्रिया कमी करू शकतात. यावेळी पाणी प्या.
तसेच पाणी आणि ताज्या ज्यूसव्यतिरिक्त सोडा, कोल्डड्रिंक्स पॅकेज केलेले पेय व साखरयुक्त पेयांचे सेवन करणे टाळा. चहा, कॉफी अशा कॅफिनयुक्त आणि अल्कोहोलपासूनही दूर राहा. या दिवसांत जास्त तेलकट, मसालेदार, तिखट पदार्थांचे सेवन शक्यतो करू नका.
तसेच वातानुकूलन असलेल्या ठिकाणातून उन्हात जाताना काही वेळ वातानुकूलन यंत्रणा बंद करून शरीराचे तापमान बाहेरील तापमानाशी जुळेल असे ठेवा; जेणेकरून उन्हाचा त्रास जास्त प्रमाणात होणार नाही.