मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पण पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षाच आहे. रविवारी पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे कोरडेच राहीले. दरम्यान हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना सोमवारपासून ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
रविवारी यवतमाळ, वाशीमसह बुलढाणा, अकोला, अमरावती तसेच गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पूढील काही दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे खात्याच्या या अंदाजानंतर तरी पाऊस येईल का, याविषयी शंका आहे. वाशीम जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. एरवी मोसमी पाऊस पेरणीला मदत करतो, पण पावसाचा जोर अधिक असल्यामुळे शेतीत पेरलेले बियाणे व पिके वाहून गेली. अनेक ठिकाणच्या शेतीला तलावाचे स्वरुप आले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. यवतमाळ जिल्ह्यातही रविवारी मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्यातील नेर तालुक्यात सुमारे तासभर पावसाने झोडपले. त्यामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत असतानाच शेतजमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.
पश्चिम विदर्भात पाऊस धो-धो कोसळत असताना पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे गेल्या काही दिवसांपासून कोरडेच आहेत. हवामान खात्याने शनिवारी पूर्व विदर्भातही मोसमी पावसाच्या आगमनाची घोषणा केली. मात्र, आकाशात काळ्या ढगांच्या गर्दीशिवाय पाऊस सातत्याने पाठ फिरवत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळेल असे वातावरण तयार होत असताना पावसाची मात्र प्रतिक्षाच आहे. मुंबईत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून आजपासून पुढील दोन दिवसांसाठी मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरी, रायगड आणि पुणे, सातारा कोल्हापूर येथे ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विदर्भातही आजपासून पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्र ते कर्नाटक आणि केरळच्या उत्तरेकडील भागात वाऱ्याच्या मध्यम दबावाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून जोरदार वारे वाहू लागले आहेत. तर यामुळेच अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज खासगी हवामान संस्थेने दिला आहे.