कोर्टाचे कामकाज सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका आला. ते खुर्चीतून जमिनीवर कोसळले. ही बाब न्यायाधीशांच्या लक्षात येताच, त्यांनी इतरांच्या मदतीने वकिलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. न्यायाधीशांनी वकिलाला तातडीने उपचार मिळावा म्हणून धावपळ केली, पण त्यांना यश आले नाही. वकीलाची प्राणज्योत मालवली. नागपूर जिल्हा न्यायालयातील या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
नागपूर जिल्हा न्यायालयातील प्रकार
नागपूर जिल्हा कोर्टात एक हृदयद्रावक घटना घडली. ज्येष्ठ वकील इकबाल कुरेशी (64) न्यायालयीन कामकाजासाठी सकाळी 11.30 वाजता जिल्हा न्यायालयात पोहचले. सातव्या मजल्यावरील दिवाणी न्यायालयात त्यांच्या एका प्रकरणावर सुनावणी होणार होती. प्राथमिक सुनावणीत त्यांनी कोर्टाला प्रकरणाची माहिती दिली आणि न्यायनिवाडे सादर केले. त्यानंतर ते खुर्चीत बसले. प्रतिपक्षाच्या वकिलांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कुरेशी हे खुर्चीतून खाली कोसळले.