केकमुळे कॅन्सरचा धोका : कोणी दिला इशारा?

केक खाण्याची आवड प्रत्येकाला असते. प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी केक कापण्याची जणू प्रथाच झाली आहे. त्यासाठी प्रत्येक जण बेकरीतून केक मागवतो. परंतु, आता केक मागविताना तुम्हाला पुनर्विचार करणे भाग पडणार आहे. कर्नाटक अन्न सुरक्षा विभागाला स्थानिक बेकरीद्वारे तयार करण्यात येणार्‍या केकमध्ये संभाव्य कर्करोगास (कॅन्सर) कारणीभूत ठरणारे घटक आढळून आले आहेत. या केकमध्ये विहित मर्यादेपेक्षा जास्त कृत्रिम रंग आढळून आले; ज्यामुळे एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो, असे विभागाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. नेमके हे प्रकरण काय? केकमध्ये नक्की कोणते घटक आढळून आले? खरंच त्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो का? त्याविषयी जाणून घेऊ.

 

सुरक्षा चाचणीत नक्की काय आढळून आले?

कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने बंगळुरूच्या विविध बेकऱ्यांमधील केक नमुन्यांची चाचणी केली. चाचणीतील २३५ पैकी २२३ नमुने वापरासाठी सुरक्षित मानले गेले. उर्वरित १२ नमुन्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कृत्रिम रंग आढळून आले. विशेषतः रेड वेल्वेट व ब्लॅक फॉरेस्ट केक यांसारख्या आकर्षक दिसणार्‍या केकमध्ये या रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. अन्न सुरक्षा आयुक्त श्रीनिवास के. यांनी ‘द हिंदू’ला सांगितले की, १२ नमुन्यांमध्ये अल्लुरा रेड, सनसेट यलो एफसीइये, पोन्सेओ ४आर, टार्ट्राझिन व कार्मोइसिन यांसारख्या कृत्रिम रंगांचा विहित मर्यादेपेक्षा जास्त वापर केला गेल्याचे दिसून आले आहे. सनसेट यलो हा नारिंगी-पिवळा रंग आहे; जो सामान्यतः कँडी, सॉस, भाजलेले पदार्थ आणि फळांमध्ये वापरला जातो. तर, कार्मोइसिन हा लाल रंग, अन्नपदार्थांमध्ये गडद लाल रंग देण्यासाठी वापरला जातो.

 

 

कर्नाटक अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने बंगळुरूच्या विविध बेकऱ्यांमधील केक नमुन्यांची चाचणी केली. चाचणीतील २३५ पैकी २२३ नमुने वापरासाठी सुरक्षित मानले गेले. उर्वरित १२ नमुन्यांमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे कृत्रिम रंग आढळून आले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : ‘ISIS’ने अपहरण केलेल्या याझिदी महिलेची ‘गाझा’मधून तीन देशांनी कशी केली १० वर्षांनंतर सुटका?

 

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कृत्रिम खाद्यरंग प्रति किलोमध्ये १०० मिलिग्रॅम असावेत. अल्लुरा रेड, सनसेट यलो एफसीइये, पोन्सेओ ४आर, टार्ट्राझिन व कार्मोइसिन हे खाद्यपदार्थांमध्ये प्रतिकिलोमागे जास्तीत जास्त १०० मिलिग्रॅम या प्रमाणात असावेत; परंतु चाचणी केलेल्या नमुन्यांमध्ये विहित मर्यादेपेक्षा जास्त रंग वापरला असल्याचे आढळून आले आहे. “रेड वेल्वेट व ब्लॅक फॉरेस्ट यांसारख्या केकचे आकर्षण वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या रसायनांचा कर्करोग आणि इतर गंभीर आरोग्य धोक्यांशी संबंध आहे. त्याच्या अतिवापरामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो,” असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

कायद्यानुसार, २००६ च्या अन्न सुरक्षा आणि मानक कायदा आणि २०११ पासून संबंधित अन्न सुरक्षा नियमांनुसार या पदार्थांचे काटेकोरपणे नियमन केले जाते. अन्न सुरक्षा आयुक्तांनी पुढे इशारा दिला की, या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास गंभीर दंड होऊ शकतो; ज्यामध्ये सात वर्षांपर्यंत कारावास आणि १० लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. मार्चच्या सुरुवातीला, कर्नाटक सरकारने गोबी मंचुरियन व कॉटन कँडी यांसारख्या लोकप्रिय पदार्थांमध्ये आढळणारा सिंथेटिक औद्योगिक रंग, रोडामाइन-बी वापरण्यास बंदी घातली होती. आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, या बंदीचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.

 

आरोग्य धोके काय आहेत?

कृत्रिम अन्न रंग हे अन्नाचे स्वरूप सुधारण्यासाठी वापरले जाणारे रसायन आहे. खाद्यपदार्थांमध्ये शतकानुशतके रंग वापरण्यात येत आहेत. १८५६ मध्ये कोळशापासून पहिला कृत्रिम रंग विकसित करण्यात आला होता. आज हे रंग प्रामुख्याने पेट्रोलियमपासून तयार केले जातात. अनेक वर्षांमध्ये अनेक कृत्रिम रंग विकसित केले गेले आहेत; परंतु बहुतेक रंग विषारी असल्याचे आढळले आहे. ‘एन्व्हायर्न्मेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्हज’मधील अभ्यासात असे नमूद केले आहे की, सनसेट यलो आणि इतर तीन सामान्य रंगांमुळे त्वचेवर सूज येणे, अंगावर पित्ताच्या गाठी उठणे आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांस, अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. अस्थमाच्या रुग्णांमध्ये या रंगांची प्रतिक्रिया होण्याची शक्यता ५२ टक्के जास्त असते.

 

टारट्राझिन या रंगाला यलो ५ म्हणूनही ओळखले जाते. हा रंगदेखील आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त बर्कले विद्यापीठ आणि डेव्हिस विद्यापीठाच्या २०२१ च्या अभ्यासाने पुष्टी केली की, रंगाचा समावेश असलेल्या पदार्थांच्या सेवनाने मुलांमध्ये हायपर अॅक्टिव्हिटीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. फोर्टिस रुग्णालयातील पोषण तज्ज्ञ दीप्ती खातुजा यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले, “सिंथेटिक रंगांच्या अन्नातील भेसळीमुळे अतिसार, मळमळ, डोळ्यांच्या समस्या, यकृताचे विकार आणि अगदी कर्करोगासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.” त्यांनी ‘मेटॅनिल यलो’सारख्या रसायनांवरही प्रकाश टाकला; ज्याचा वापर अनेकदा कडधान्य आणि हळदीचा रंग गडद करण्यासाठी केला जातो; ज्यामुळे कर्करोगजन्य धोका निर्माण होतो.

 

त्यामुळे कर्करोग होऊ शकतो का?

कृत्रिम खाद्यरंग आणि कर्करोग यांच्यातील निश्चित दुवा स्थापित केला गेला नसला तरी अनेक अभ्यासांनी त्यांच्या कार्सिनोजेनिक प्रभावांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्यास. उदाहरणार्थ- काही प्राण्यांच्या अभ्यासात कार्मोइसिनला थायरॉईड ट्युमरशी जोडले गेले आहे; ज्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्याच्या वापरावर निर्बंध आले आहेत. मात्र, असे असले तरीही अन्न उत्पादनांमध्ये त्याची परवानगी आहे. हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की, या प्राण्यांच्या अभ्यासामध्ये वापरलेले रसायनांचे प्रमाण माणसांसाठी समान धोका दर्शवीत नाहीत. कारण- माणसांनी वापरलेल्या रंगांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे.

 

“कृत्रिम रंग ही तांत्रिक गरज ठरत आहे. कारण- अन्नावर करण्यात येणार्‍या प्रक्रिया आणि साठवणुकीदरम्यान अन्नपदार्थ त्यांची नैसर्गिकता गमावतात. परंतु, प्रयोगांमध्ये बहुतेक खाद्यरंगांचे सेवन अत्यंत मोठ्या प्रमाणात केल्यास, त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, असे दिसून आले आहे,” असे खातुजा यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. सध्या या रंगांचा कर्करोगाशी थेट संबंध जोडणारा कोणताही निर्णायक पुरावा नाही. मात्र, तज्ज्ञांनी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी विहित मर्यादेतच त्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

About विश्व भारत

Check Also

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द   टेकचंद्र सनोडिया …

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *