आई आणि वडिलांचे वय सारखेच असूनही आईच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसून येतात; पण असे का होते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर यामागे असे सांगितले जाते की, वेळेआधीच रजोनिवृत्तीमुळे जैविक वृद्धत्वाची प्रक्रिया जलद गतीने होते. अशाने आईच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षण वयाआधी दिसू लागतात. पण त्यामागे आणखी काय कारणे आहेत ते जाणून घेऊ…
याबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट तान्या मलिक म्हणाल्या की, हार्मोनल बदल हेदेखील वयाआधीच वृद्धत्व येण्यामागचे प्रमुख कारण आहे. बर्नआउटमुळेदेखील हे होते.
अनेक मातांना सवय असते की, काम करण्याचा गडबडीत त्या वेळेवर जेवत नाहीत. अनेकदा त्या जेवणही विसरतात. कमी झोप, गर्भधारणेदरम्यान पोषक घटकांचा अभाव आणि दीर्घकालीन ताण यामुळे हार्मोनल पातळी असंतुलित होते. महिलांमध्ये वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत इस्ट्रोजेन तयार होते, त्यानंतर ते कमी होते आणि वृद्धत्वाची लक्षणे वाढू लागतात. यादरम्यान पोटाची चरबी वाढू लागते, हाडांची झीज सुरू होते. तसेच, मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. यात रजोनिवृत्तीचा काळ सुरू होतो तेव्हा कोणत्याही महिलेची त्या काळात भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांना सामोरे जाण्याची तयारी नसते.
डायटीशियन न्यूट्रिशनिस्ट, फिजिओथेरपिस्ट व सर्टिफाइड डायबिटीज एज्युकेटर डॉ. अर्चना बत्रा म्हणाल्या की, वयाच्या ५० व्या वर्षी शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते आणि इतर हार्मोनल बदलांसह इस्ट्रोजेनमध्ये घट होते.
दरम्यान, डॉ. शर्मा आणि चावला दोघांनीही आईने वाढत्या वयाबरोबर कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
आहारात बदल
आईने आहारात प्रथिनांचे सेवन वाढवले पाहिजे. रजोनिवृत्तीच्या आधी किंवा नंतर शरीराच्या वजनाच्या प्रतिकिलो ५-१० ग्रॅम प्रथिने आवश्यक असते. ५० च्या दशकातील लोकांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग ही एक सामान्य समस्या आहे. यूटीआय आणि इतर संसर्गांवर उपचार करण्यासाठी औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; परंतु या उपचारांमुळे चांगले आणि वाईट असे दोन्ही जीवाणू (ज्याला प्रो-बायोटिक्स असेही म्हणतात, जे आतड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळतात) नष्ट होतात आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीमला हानी पोहोचवू शकतात.
पूरक पदार्थ
व्हिटॅमिन ई व सीच्या सेवनाने त्वचेला योग्य हायड्रेशन मिळते, ज्यामुळे त्वचा कोमल, लवचिक व मुलायम दिसते. सूर्यफुलाच्या बिया, बदाम व पालक या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण अधिक असते. आणि सिमला मिरची, ब्रोकोली, संत्री व टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे सेवन दिवसातून तीन वेळा केले पाहिजे. धान्य, ब्रेड व ज्यूस यांसारखे पदार्थ, जे या दोन्ही महत्त्वाच्या आहारातील घटकांनी समृद्ध आहेत. मॅग्नेशियम, ओमेगा ३ व जीवनसत्त्वे B6, B9 व B12 पासून सुरुवात करा.
डॉ. बत्रा म्हणाल्या की, नियमित प्रो-बायोटिक सप्लिमेंट्स घेणे आणि दही, पनीर, केफिर, ताक, इडली इत्यादी पदार्थ खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते आणि ही औषधे घेतल्यानंतर पचनसंस्था लवकर बरी होण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात ठेवा
या वयात उच्च रक्तदाब ही समस्या बनू शकते. पांढऱ्या मिठाचे सेवन पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या ह्रदयाचे आरोग्य निरोगी राहते. मिठाऐवजी जेवणात तुम्ही लसूण पावडर, कांदा पावडर, पेपरिका, मिरपूड, लिंबूवर्गीय फळे व ताज्या औषधी वनस्पतींसारखे मसाले वापरून पाहू शकता. तुम्ही आहारात सोडियममुक्त किंवा कमी सोडियमचा पर्यायदेखील निवडू शकता.
शारीरिक हालचाली
तुमच्या आईला आठवड्यातून किमान तीन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला सांगा. तिने सात ते नऊ तास झोप घेणे गरजेचे आहे. तसेच मानसिक आणि भावनिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तिने स्वत:ला वेळ द्यायला हवा.