महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी यांची निवड
🌱यंदाचे संमेलन अमरावतीत
अमरावती : अखिल भारतीय पक्षिमित्र संमेलन अमरावती येथे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेले आहे. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात ०१ आणि ०२ नोव्हेंबर या कालावधीत संमेलन होईल. ३८ वे महाराष्ट्र राज्य तथा तिसरे संमेलन आहे.
या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून निवृत्त सनदी अधिकारी तथा “मित्रा” या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष प्रवीणसिहं परदेशी (IAS Rtd.) यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षीमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत आहे. पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. अशा प्रकारचे संघटन आणि पक्षिमित्रांचे संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. संपूर्ण राज्यात आजवर ३७ राज्यस्तरीय संमेलने व विभाग स्तरावरील ३० संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनापूर्वी स्थानिक स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे. संमेलनासाठी राज्यातून व राज्याबाहेरून जवळपास ३०० प्रतिनिधी उपस्थित असतील.
संमेलनाध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी हे त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासूनच वन्यजीव व पक्षी छायाचित्रकार आणि वन्यजीव संवर्धक म्हणून संपूर्ण राज्यात परिचित आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसन तसेच राज्याच्या वन विभागाचे प्रधान सचिव असताना त्यांनी वन विभागात अतिशय धडाडीने काम करून जंगल, वन्यजीव संवर्धनात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. महाराष्ट्र पक्षिमित्र सोबत ते गेल्या ३ दशकांपासून जुळलेले असून त्यांनी अनेक संमेलनात उपस्थित होते. तसेच संमेलनाच्या आयोजनातही मोलाची भूमिका बजाविली होती. सध्या ते वन्यजीव क्षेत्रातील सर्वात जुन्या अशा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्षही आहेत. महाराष्ट्र पक्षिमित्र राज्य कार्यकारिणीकडून प्रवीणसिंह परदेशी यांची निवड करण्यात आल्याची महिती महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणी सदस्य नितीन मराठे यांनी दिली आहे.