लाडकी बहिण योजना राबवू शकते;तर शेतकऱ्यांची कर्ज माफी का नाही?
आज बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत सापडलेला आहे.त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण जीवन निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना नेहमीच करावा लागतो.त्यांनी शेतीसाठी लावलेला खर्च, त्यातून निघणारे उत्पन्न आणि शेतीतून निघणाऱ्या मालाला योग्य भाव मिळणे गरजेचे असते.परंतु शेतकरी याच ठिकाणी फसतो.कारण शेतातून निघालेल्या मालाला योग्य भावच मिळत नाही. कारण त्यांची कोंडी सरकार व व्यापारी वर्ग करीत असतो. शेतातून उत्पन्न जेव्हा निघते तेव्हा त्यांच्या मालाला नगण्य भाव असतो.अशा परिस्थितीत त्यांच्या परिवारांचा उदरनिर्वाह होणे कठीण होते आणि काही शेतकरी आत्महत्येचा सहारा घेतात तर काही शेतकरी कर्जबाजारी होतात व कर्जाचा बोजा पेलवला नाही तर आपली जीवनलिला संपवितात हा प्रकार एकट्या महाराष्ट्रात नसुन संपूर्ण देशात दिसून येते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर पदोपदी फुंकर घालण्याचे काम केंद्र सरकार व राज्य सरकारांनी केले पाहिजे कारण शेतकरी हा अन्नदाता आहे.परंतु केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार निवडणुकीत भरगच्च आश्वासने देतात. परंतु निवडून आल्यानंतर जेव्हा आश्वासन पुर्ती करण्याची वेळ येते तेव्हा संपूर्ण आश्वासनाची विसर पडते हे कृषिप्रधान देशाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.आज हिच परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येते.महायुती सरकारने निवडणुकी पुर्वी लाडकी बहिण योजना आणली,युवकांना रोजगार,शेतकऱ्यांचे कर्ज माफ व सातबारा कोरा असे अनेक आश्वासन सरकारने दिले होते.परंतु ज्यापासून आपल्याला लाभ होईल ती लाडकी बहिण योजना निवडणूकी पुर्वीच सरकारने अंमलात आणली व लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रूपये ताबडतोब जमा होणे सुरू झाले.परंतु शेतकऱ्यांची कर्ज माफी किंवा सातबारा कोरा याचे आश्वासन सरकारने दिले होते त्याचा विसर आज महाराष्ट्र सरकारला पडल्याचे दिसून येते.जो शेतकरी राबराब राबतो आणि देशाच्या १४० कोटी जनतेच्या पोटाची खळगी भरतो त्यांच्या आश्वासनांची पूर्तता न करता त्यांना सरकार तारीख पे तारीख दाखवून ठेंगा दाखवितो ही तर कृषिप्रधान देशाला काळीमा फासणारी बाब आहे.एकीकडे सरकार म्हणते की आम्ही कर्ज माफी करण्यास कटिबद्ध आहोत तर दुसरीकडे कर्ज माफीची तारीख किंवा मुहूर्त ठरवित नाही ही तर सरकारची दोगली निती म्हणावी लागेल.सरकार स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांच्या आधी लाडकी बहिण योजना जुलै २०२४ पासून सुरू केली या एकावर्षात ४३०४५ करोड रुपये खर्च करू शकते आणि अन्नदाता शेतकरी जो देशाच्या १४० कोटी जनतेच्या पोटाची खळगी भरत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचेच राजकारण करतात ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यां अजुनपर्यंत थांबलेल्या नाहीत, निसर्ग त्यांना साथ देत नाही, ओला दुष्काळ,सुका दुष्काळाचा सामना नेहमीच करावा लागतो.अशा परिस्थितीत त्यांच्या हाती फक्त भोपळा लागतो ही घटना पिढोणपिढ्या शेती करणाऱ्यां शेतकऱ्यांची आहे.या उलट जो राजकीय पुढारी पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी व स्वयंघोषित समाजसेवक समजतो तो मात्र पाच वर्षांत करोडपती होवून सात पिढ्या बसून खाईल इतकी संपत्ती जमा करून ठेवतो.म्हणजे मनाने व विचाराने श्रीमंत असणारा शेतकरी गरीबांच्या खाईत गुदमरत जातो आणि पाच वर्षे राजकीय सत्ता भोगलेला राजकीय पुढारी करोडपती होतो ही कृषिप्रधान देशासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.बच्चु कडू यांनी शेतकऱ्यांसाठी जी आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्याची दखल मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी घेतली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे याचे मी मनापासून स्वागत करतो.कारण शेतकऱ्यांना कर्ज माफी कधी होणार हे कळायला मार्ग शेतकऱ्यांजवळ नव्हताच. परंतु शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून कर्ज माफीची तारीख सध्यातरी निश्चित झालेली दिसत आहे. मिडियाच्या व वर्तमानपत्राताच्या माहितीनुसार ३० जूनच्या पूर्वी कर्ज माफी होईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेला दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून येते.परंतु सरकारने व संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की शेतकरी हा वारंवार अडचणीत सापडत असतो.त्यामुळे त्यांच्या जखमेवर फुंकर घालने हे सरकारने प्रथम कर्तव्य असते.सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली शेती सावरायला सुरूवात केली होती.परंतु अचानक अवकाळी पाऊस आणि “मोंथा” चक्रीवादळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अचानक पाऊसाने हजेरी लावली व निघालेल्या आणि निघणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे अशा कठीण प्रसंगी शेतकरी फक्त सरकारकडे मोठ्या आशेने मदतीची वाट पहात असतो.कारण शेतकऱ्यांना कल्पना असते की कठीण परिस्थितीत सरकारच आमची मदत करू शकेल. राज्यातील शेतकऱ्यांचा आराखडा व हवामानाचा अंदाज यांची संपूर्ण माहिती सरकार जवळ असते.त्यामुळे सरकारने एखादा खर्च कमी करावा परंतु शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे असे मला वाटते.कारण देशासह राज्यातील शेतकरी अत्यंत हळव्या मनाचा आहे कारणं शेतकऱ्यांना निसर्गाने सुईच्या टोकाऐवढा जरी धोका दिला तरी तो पुर्णतः खचुन जातो याची जाण सरकारने ठेवावी व शेतकऱ्यांच्या संपूर्ण अडचणींवर गांभीर्याने लक्ष केंद्रित करून त्यांना सर्वोतोपरी मदत करावी.सरकारने ३० जून पुर्वी कर्ज माफीचा जो निर्णय घेतला त्याचे पुनश्च मनापासून स्वागत करतो.जय जवान जय किसान.जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
( स्वतंत्र पत्रकार )
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
विश्वभारत News Website