Breaking News

कामठी, मौदात कोण बाजी मारणार? : बावनकुळेंना फुटतोय घाम

काँग्रेसचा गड अशी नागपूर जिल्ह्यातील कामठीचे राजकीय चित्र. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मताधिक्य मिळाले. गेली अनेक वर्षे कामठी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. अशा या कामठीमध्ये एकदाही नगराध्यक्षपद न मिळालेल्या भाजपचा झेंडा फडकवण्याचे आव्हान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर आहे.

 

कामठी नगरपालिकेत एकदा समाजवादी पक्ष व बरिएमचा नगराध्यक्ष वगळता, काँग्रेसने येथे नेहमीच बाजी मारली आहे. मात्र यावेळी येथे चौरंगी लढत होणार असून काँग्रेसला मतविभाजनाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. कामठीत भाजपची परंपरेने पीछेहाट झाली असली तरी, कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या अनुकूल स्थितीचा लाभ भाजपला करून देतील का, याकडे लक्ष लागले आहे. तर मौदा नगरपंचायतसाठी भाजपकडून प्रसन्ना तिडके रिंगणात आहेत. येथे भाजप आणि काँग्रेस समतोल असल्याचे चित्र आहे.

 

कामठी शहराचे राजकीय चित्र नेहमीच काँग्रेसकडे झुकते. अगदी अलीकडील विधानसभा निवडणुकीतही, भाजपचे वरिष्ठ नेते व पालकमंत्री बावनकुळे यांना येथे काँग्रेसपेक्षा कमी मते मिळाली होती. यावरून कामठीतील काँग्रेसची पायाभरणी किती घट्ट आहे, हे दिसून येते. मात्र यावर्षीची नगरपरिषद निवडणूक नवे राजकीय समीकरण निर्माण करत आहे. कामठी शहरात अनेक वर्षांपासून राजकीय धुमश्चक्री पहायला मिळते. मात्र यंदाच्या निवडणुकीत स्थानिक नाराजी, अंतर्गत गटबाजी, पक्षांतर आणि सामाजिक समीकरणे या सर्वांचा एकत्रित परिणाम लढतीवर दिसून येत आहे.

 

मतविभाजनाची चिन्हे

१) काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी शाकूर नागानी यांची उमेदवारी निश्चित केली. यामुळे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शहाजहाँ अन्सारी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. ते आता या पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. परिणामी काँग्रेसच्या मतांचे विभाजन होण्याची चिन्हे आहेत.

 

२) विधानसभा व लोकसभा निवडणुकांत भाजपबरोबर असलेल्या बरिएमच्या नेत्या ॲड. सुलेखा कुंभारे यांनी यावेळी भाजपपासून फारकत घेतली आहे. बरिएमचे अजय कदम हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. भाजपने अजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे.

 

३) बरिएमचे अजय कदम यांनी अर्ज कायम ठेवल्याने काँग्रेस आणि भाजप दोघांचीही चिंता वाढली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे अल्पसंख्याक आणि वंचित मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता असून त्यामुळे संपूर्ण निकालाचे समीकरण बदलू शकते. भाजपलाही या मतांचे महत्त्व असल्याने त्यांच्या गणितातही विस्कळीतता संभवते.

 

पीछेहाट रोखण्याचे आव्हान

काँग्रेसला परंपरागत पकड टिकवण्यासाठी एकजूट दाखवावी लागणार आहे. भाजपने स्थानिक असंतोष कमी करत संघटनशक्ती बळकट करण्याची गरज आहे. बरिएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढत देत वातावरण अधिकच रंगतदार केले आहे. याच कारणामुळे कामठी नगरपालिका निवडणूक ही केवळ पक्षांमधीलच नव्हे, तर पालकमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

About विश्व भारत

Check Also

आज टूट जाएगी महायुति? एकनाथ शिंदे के बेटे श्रीकांत का बयान

आज टूट जाएगी महायुति? एकनाथ शिंदे के बेटे श्रीकांत का बयान टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

‘भाजपा बाटलेला पक्ष, आयुष्य फोडाफोडीत गेले’: महाराष्ट्रातील मंत्र्याच्या विधानाने खळबळ

भाजपा हा बाटलेला पक्ष आहे, त्यांना फोडाफोडी करण्याशिवाय काहीच येत नाही’, असे विधान राज्याचे क्रीडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *