महानगर पालिका निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवरून आरोप–प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याद्यांमधील त्रुटींवरून सोमवारी झालेल्या बैठकीत महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना फैलावर घेत कठोर शब्दांत झापले. “गांजा पिऊन की झोपा घेऊन या याद्या तयार केल्या आहेत?” अशा शब्दांत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याची माहिती बैठकीतील एका अधिकाऱ्याने दिली.
महानगर पालिकेच्या निवडणूक विभागाने अलीकडेच प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या. मात्र, या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आणि त्रुटी असल्याचे सातत्याने आरोप होत आहे. तरीही निवडणूक विभाग शांत असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही नाराजीला ऊत आला आहे.
त्यावर सोमवारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. विधानसभा मतदारसंघातील याद्या फोडून प्रभागनिहाय तयार करताना अधिकाऱ्यांनी पुरेशी दक्षता घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे याद्यांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत तीव्र नाराजी व्यक्त केली. “गांजा पिऊन की झोपा घेऊन काम केले आहे का,” असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
अत्यंत संयमी म्हणून ओळखले जाणारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा असा रौद्र अवतार अधिकाऱ्यांनी प्रथमच पाहिल्याची चर्चा आहे. याद्यांतील सर्व चुका तातडीने सुधारून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची संधी आयुक्तांनी निवडणूक विभागाला दिली आहे. त्याबाबत स्पष्ट निर्देशही दिले आहेत. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावल्यानंतर महापालिकेत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
महाविकास आघाडीने प्रतीकात्मक मतदार यादी जाळली
महाविकास आघाडीच्या वतीने प्रारूप मतदार यादीतील त्रुटींविरोधात प्रतीकात्मक यादी जाळून निवडणूक विभागाचा निषेध करण्यात आला. प्रारूप याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत, असा आरोप त्यांनी केला असून, या त्रुटी दूर करूनच निवडणूक घेण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे.
विश्वभारत News Website