✍️लेखक : *रमेश लांजेवार*
(मुक्त पत्रकार )
📱9921690779
अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू आहे, परंतु अवैध आणि मोठ्या प्रमाणावर होणारे खनन २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने चर्चेत आले, विशेषतः २००२ मध्ये अवैध खननाबद्दल तक्रारी आल्या आणि ऑक्टोबर २००२ मध्ये खनन थांबवण्याचे आदेश सरकारकडून दिले गेले. मुख्यत्वे करून प्राचीन काळापासून अरवली पर्वत ही पृथ्वीवरील सर्वात जुन्या पर्वतरांगांपैकी एक आहे ,असे सांगितले जाते की सुमारे २ अब्ज वर्षे जुनी अरवली पर्वत रांगा आहेत आणि खनिजे काढणे हे नैसर्गिकरित्या घडत असले तरी,आधुनिक काळातील बेकायदेशीर खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अनेक जटील समस्या निर्माण झाल्या आहेत. २०२४-२०२५ सर्वोच्च न्यायालयाने नवीन खनन परवाने थांबवले आणि मार्च २०२४ मध्ये सीईसी ने वैज्ञानिक मॅपिंग आणि पर्यावरण प्रभाव मूल्यांकन करण्याची शिफारस केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १०० मीटरच्या व्याख्येवर पुनर्विचार केला, ज्यामुळे ‘अरवली बचाव’ मोहीम तीव्र झाली.अरवली पर्वतांचे खनन हे अनेक दशकांपासून सुरू आहे, परंतु अलीकडच्या काळात, विशेषतः २००२ नंतर, ते कायदेशीर आणि पर्यावरणीय वादामुळे खूप चर्चेत आले. दिल्लीपासून हरियाणा आणि राजस्थानमधून गुजरातपर्यंत सुमारे सातशे किलोमीटर पर्यंत पसरलेल्या अरवली पर्वतरांगा भारताचा नैसर्गिक किल्ला म्हणून ओळखल्या जातो म्हणजेच अरवली पर्वत भारताची अबाध्य ढाल आहे.अशा ऐतिहासिक, नैसर्गिक, सुरक्षित,प्राचीन, सांस्कृतिक भारताचा आत्मा अशा महाकाय अरवली पर्वताचे जर आपण अवैधरित्या खनन करीत असाल तर तीला हत्याच म्हणावी लागेल व येणारा काळ अक्राळविक्राळ रूप धारण करून सर्वत्र ओसाड दिसून येईल व पृथ्वीचा आणि निसर्गाचा विनाश झाल्याशिवाय रहाणार नाही.या पृथ्वीतलावर सर्वांनाच रहाण्याचा व जगण्याचा अधिकार आहे.परंतु बुध्दीजीवी मानवाने अतीरेक केला तर मानवाचा अंत तर होईलच सोबतच संपूर्ण मुक्या प्राण्यांचा पशुपक्षी,जीवजंतू, निसर्ग,स्थल,जल,वायु या सर्वांचा श्वास कोंडेल व एक वेळ अशी येईल की सर्वांनाच मृत्यू आपल्याकडे ओढेल आणि या पृथ्वीतलावर संपूर्ण जीवन लीला समाप्त होईल.त्यामुळे आज काळाची गरज आहे की वृक्ष, नदी, तलाव,पर्वतरांगा, डोंगरदऱ्याचा भाग यांना वाचविलेच पाहिजे. कारण खनन व वृक्षतोडीमुळे हवामानात आमुलाग्र बदल झालेला आहे आणि हा बदल एवढा झाला आहे की आपण त्याची कल्पना सुध्दा करू शकत नाही यामुळे सर्वत्रच प्रदुषणाचे सावट मोठ्या प्रमाणात दिसून येते.देशातील काही राज्यातील शहर प्रदुषणाच्या बाबतीत रेड झोनमध्ये आले आहेत आणि जगात प्रदुषणाच्या बाबतीत भारत अव्वल स्थानावर आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. दिल्ली सारख्या राजधानीमध्ये प्रदुषणामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये गॅसचेंबर सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.हा संपूर्ण प्रकार औद्योगिकरण, शहरीकरण,जलप्रदूषण,खनन व निसर्गावर होत असलेल्या अत्याचारामुळे व अन्यायामुळे निर्माण झाला आहे.१९९० च्या दशकांपासून अरवली पर्वताच्या खननवर पर्यावरणीय निर्बंध लादले गेले आणि २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फरिदाबाद,गुरूग्राम आणि मेवात जिल्ह्यामध्ये खाणकामावर बंदी घालण्यात आली होती. तरीही बेकायदेशीर खाणकाम अजूनही सुरू असल्याचे दिसून आले.यावरून स्पष्ट होते की गेल्या अनेक दशकांपासून अरवली पर्वताचे खाणकाम सुरूच आहे.यावरून स्पष्ट होते की खनन माफिया अरवलीच्या भोवताल सक्रिय आहेत.परंतु अरवली पर्वताच्या होत असलेले तिव्र आंदोलन व विरोध पहाता केंद्र सरकारने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षित क्षेत्राचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.२००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये खाणकामावर पूर्णपणे बंदी घातली होती.तरीही खनन माफिया सक्रिय असल्याने अवैधरित्या खनन करून अरवली पर्वतांना छिन्नविछिन्न करने सुरूच आहे.परंतु आता सरकारने अरवली पर्वताला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे याचे स्वागत.नोव्हेंबर २०२५ मध्ये पर्यावरण मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशीनुसार सर्वोच्च न्यायालयाने अरवली टेकड्या आणि अरवली पर्वतरांगा यांच्या एकसमान कायदेशीर व्याख्येचा स्वीकार केला.या व्याख्येनुसार “अरवली टेकडी”म्हणजे स्थानिक आसपासच्या भुभागापेक्षा किमान १०० मीटर उंचीची भूरचना आणि अरवली पर्वतरांगा म्हणजे एकमेकांपासून ५०० मीटरच्या आत अशा दोन किंवा अधिक टेकड्यांचा समूह असे निश्चित करण्यात आले आहे.मात्र या व्याख्याबदलामुळे अरवली क्षेत्राचा ९० टक्के भाग खान कामासाठी खुला होईल,असा आरोप आंदोलकांनी केला आहे.मात्र हा आरोप सरकारने नाकारला असुन अरवलीच्या संरक्षणास कटिबद्ध असल्याचा दावा सरकारने केला आहे.परंतु सरकारचा दावा कितपत सत्य आहे ही बाब पुढील काही काळात लक्षात येईल.सरकारने निसर्गाचा होत असलेला ह्यास पहाता महत्वपूर्ण अरवली पर्वताचे खनन पुर्णतः थांबविले पाहिजे.कारण आज अरवली पर्वताच्या रांगामुळे अनेक विनाशकारी दुर्घटना रोखण्यास मोठी मदत होते आहे व संपूर्ण जीव सृष्टीला मोकळा आणि आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याचे काम अरवली पर्वताच्या माथ्यावर होत आहे. आज आपल्याला अती ऊन,अती पाऊस, सुनामी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, ग्लेशियर वितळने, जलप्रदूषण, वायुप्रदूषण, अवकाळी पाऊस,वणवा लागने यावर जर मात करायची असेल तर अरवली पर्वतासारखे संपूर्ण पर्वत व डोंगरदऱ्या यांना वाचविणे काळाची गरज आहे.देशातील राज्य सरकारे व केंद्र सरकार विकासाच्या नावाखाली निसर्गाची खुलेआम कत्तल करीत आहे ही बाब देशातील १४० कोटी जनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे आणि याचे उदाहरण सर्वांसमोर आहे.त्यामुळेच आज शहरात व गावात हिंसक प्राण्यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात मानवीय व पाळीव प्राण्यांची हाणी होत आहे. सोबतच पाणी टंचाई,जंगलाला वनवा लागने, जंगलातील पशुपक्षांना खाद्यपुर्ती या जंगल तोडीमुळे न होणे या संपूर्ण गोष्टींना जबाबदार देशातील राज्य व केंद्र सरकार आहे. निसर्गाचा होत असलेला ह्यास पहाता सरकारने खनन परवाने वाटप पुर्णतः बंद केले पाहिजे, औद्योगिकरण,शहरीकरण,वाळू उत्खनन यावर अंकुश लावला पाहिजे व अरवली पर्वत रांगा वाचविण्यासाठी सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत कारण अरवली पर्वत रांगा ह्या भारताच्या सुरक्षेची ढाल आहे.
विश्वभारत News Website