Breaking News

खळबळजनक ! अजित पवारांच्या आमदाराने लपविले १७ वाळूचे ट्रक

Advertisements

भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर कडक कारवाई सुरू असताना, पोलीस कारवाई पासून वाचण्यासाठी नागपूरकडे जाणारे वाळूचे १७ ट्रक चक्क एका राईस मिलमध्ये लपवून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. वरठी येथील आमदार राजू कारेमोरे यांच्या राईस मिल परिसरात दडवून ठेवलेले हे १७ ट्रक महसूल विभागाने धाड टाकून जप्त केले आहेत.

Advertisements

भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या थेट निर्देशानुसार महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून, वरठी येथील आमदार राजू कारेमोरे यांच्या मालकीच्या ‘जय किसान राईस मिल’ (मोहगाव देवी) परिसरात लपवून ठेवलेले १७ वाळूचे ट्रक जप्त केले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisements

गोपनीय माहितीने फुटले बिंग…

वाळूचे ट्रक मिल परिसरात दडविल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत तुमसरचे उपविभागीय अधिकारी अंबादे आणि मोहाडीचे तहसीलदार यांनी तात्काळ संयुक्त पथकासह राईस मिलवर धाड टाकली. यावेळी तिथे अवैध वाळूने भरलेले १७ ट्रक आढळून आले. प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता हे सर्व ट्रक ताब्यात घेतले.

जिल्हाधिकाऱ्यांची ‘एक्शन मोड’मध्ये एन्ट्री तुमसर आणि मोहाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी सावन कुमार यांना मिळाली होती. प्रशासकीय ससेमिरा चुकवण्यासाठी वाळू माफियांनी आपली वाहने सुरक्षित स्थळी दडवल्याचा संशय होता. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खनिज अधिकारी, तुमसरचे उपविभागीय अधिकारी अंबादे आणि मोहाडीच्या तहसीलदारांनी आज सकाळी ७:३० च्या सुमारास राईस मिलवर छापा टाकला.

लपवलेले १७ ट्रक आणि ५८ लाखांचा मुद्देमाल

तुमसर भागात सुरू असलेल्या कारवाईपासून वाचण्यासाठी १७ ट्रक ‘जय किसान राईस मिल’च्या आवारात लपवून ठेवण्यात आले होते. नागपूरच्या दिशेने जाणारे हे ट्रक नाकाबंदी टाळण्यासाठी येथे उभे होते. मात्र, प्रशासनाने वेळेत छापा टाकून सुमारे ५८ लाख रुपये किमतीचा अंदाजित मुद्देमाल (वाळूसह ट्रक) जप्त केला. याव्यतिरिक्त, मोहाडी तहसीलदारांनी इतर ठिकाणी कारवाई करत आणखी ३ ट्रक पकडले, ज्यामुळे एकूण जप्त वाहनांची संख्या २० झाली आहे.

प्रशासनाचा इशारा

जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या या थेट कारवाईने वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जप्त केलेले सर्व ट्रक सध्या मोहाडी पोलीस स्टेशनच्या आवारात उभे असून, त्यावर कडक दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. “कोणत्याही दबावाला बळी न पडता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहील,” असा स्पष्ट संदेश जिल्हा प्रशासनाने यातून दिला आहे.

एका लोकप्रतिनिधीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या परिसरात अशा प्रकारे अवैध वाळूचे ट्रक आढळल्याने आता या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

२१ एप्रिलपासून शासकीय कर्मचारी संपावर!

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *