Breaking News

टप टप… सर सर…रप रप…Shabd Lalitya

पावसानं लय धरली. आपली एक-एक तान तल्लीनतेनं घेत तो वरच्या पट्टीत सरकत आहे. पावसाचं हे अतीव सुंदर संगीत मी तल्लीन होऊन ऐकत आहे. पावसाकडे पाहतच… इतक्यात शेलाट्या सावळ्या सरींनी नृत्याची लयदार गिरकी घेत सुरू केलं आपलं अप्रतिम नृत्य …! टपटपणाºया थेंबावरचा ठेका. सरसरत्या सरींचा ठेका अन् सम गाठणारा तो वेगाच्या तालावर धरलेला धुवाँधार धारांचा ठेका…!
प्रत्येक पाऊल अचूक. ना संगीतात चूक ना पदलालित्यात. भान हरवून मी पाहत आहे पावसाचं हे विलोभनीय नर्तन. इतकं सौंदर्य, इतकी समृद्धी इतकी लय पावसाठायी असते हे मी पहिल्यांदाचं अनुभवतेय जणू. तसा पाऊस मला भेटतो ऋतूगणिक. नव्या रुपात. त्याची प्रत्येक भेट निराळी असते. अनोखी असते. तो जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा तेव्हा वाटतं, आजचं भेटतोय पहिल्यांदा अन् भेटून झाल्यावर वाटतं, छे…! ही तर युगायुगापासूनची भेट आपली…!
तो भेटतो अन् भिनतो तनामनात. गूज सांगतो कधी अलवार कानात…! तो कधी शांत, सयंत, संयमी तर कधी धुसमुसळा. कधी मंद, धुंद तर कधी बेफान, भान हरवलेला. कधी त्याचं लयदार नर्तन तर कधी रौद्र तांडव.
तसा तो शुभंकरचं; पण बिथरला तर भयंकरही…! त्यानं जर हरवली लय तर नुस्ता प्रलय…..
त्याचा नियंत्रित नसेल आकार तर मग फक्त हाहाकार …! त्याच्या सरीत भिजण्याचं वय जरी निसटू जात असलं तरी मन मात्र नखशिखांत भिजून जातं वर्षावात. मी आताशा पाऊस झेलत असते माझ्या ओंजळीत… जुने ओले दिवस आठवत! चिमुकली होती तेव्हा गर्र गर्र गिरक्या घेत पावसाला चिडवत खोट्या पैशाचं त्याला आमिष देणारी. भिजल्या अंगानं आत येऊन अख्खं घर पाऊसमयी करणारी मी. आज्जीच्या वटारलेल्या डोळ्यांनी अन् पावसाच्या गारव्यानं थरथरणारी आईला तशीचं ओलेती घट्ट बिलगलेली मी. पावसाच्या प्रवाहात कागदी नाव सोडून तिच्यासोबत धावणारी मी…! आपल्या घेरदार फ्रॉकच्या ओच्यात न भिता गारांची ओटी भरणारी मी…
तरुणाईतल्या पाऊसझेल्याला मात्र इंद्र्रधनुषी, बिलोरी रूप चढलेलं. तारुण्यातल्या पावसाला मोरपंखी रंग अन् चांदण स्पर्शाचं दान मिळालेलं़ त्यावेळी पावसाचं येणं हृदयाच्या लयीशी जोडलं गेलेलं. तो राज्य करायचा काळजावर यावेळी. तेव्हा पाऊस म्हणजे अंगात भिनलेली वीज असायचा. त्या पावसात पाऊसही खट्याळ झालेला माझ्या संगतीनं. अवचित गाठायचा तो कितीदातरी मला एकांतात. ओल्या केसांंवरून गालावर ओघळणारे थेंब पाहून पाऊस कितीदातरी बेभान झालेला अनुभवलायं मी.
जोडीदाराच्या सोबतीनं झेललेला पाऊस मात्र खरी समृद्धी घेऊन आलेला. किती रूपं पावसाची अन् त्याला झेलत रंगात एकरुप माझीही…
आता पाऊस शांतावलाय…भान हरपून कोसळल्यावर! तो हळूहळू मिटू लागलायं, विरत चाललायं हे पाहून त्याच्या माझ्या नात्यातलं अजून एक परिपक्व नवं रुप मला सापडून गेलंय आताचं पडून गेल्या पावसानं…

उज्वला सुधीर मोरे देबाजे
वाशिम
9552711968

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *