वर्धा :- जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासोबतच स्वच्छतेवर भर दयावा तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी कोरोना मार्गदर्शक सूचनाच्या पुस्तिका व घडी पत्रिकेच्या विमोचन प्रसंगी केले.
जिल्हा परिषद, आरोग्य विभाग व आयुष विभागाच्या वतीने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाययोजनाच्या पुस्तिका व घडीपत्रिकेचे विमोचन जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, आरोग्य सभापती मृणाल माटे, सेलूचे पंचायत समिती सभापती अशोक मुडे, जिल्हा परिषद सदस्य वैजयंती वाघ, शरद शहारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. लक्षदिप पारेकर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदिप नखाते, वैद्यकिय अधिकारी (साथरोग) डॉ. सुवर्णा खोब्रागडे यांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणुपासुन बचाव करण्यासाठी प्रत्येकाने वारंवार साबनाने हात धुवावे, सॅनीटायझरचा वापर करावा, कोरोना विरुध्दची लढाई दिर्घकाळ लढायची असल्यामुळे स्वत:ची प्रतिकार शक्ती वाढविणे हाच सवोत्तम उपाय आहे असे मृणाल माटे म्हणाल्या.
प्रत्येक नागरिकांनी सामाजिक अंतर ठेऊन नियमित मास्कचा वापर करावा , गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोविड विषाणुच्या प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करावे . तसेच आरोग्य विभागानी तयार केलेल्या मार्गदर्शक सुचनाची ग्रामीण भागात गृहभेटी देऊन जनजागृती करावी असे आवाहन सचिन ओम्बासे यांनी केले.
कार्यक्रमाला आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.