वर्धा : जिल्हाभर राबविली जाणार “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिम – जिल्हाधिकारी

वर्धा प्रतिनिधी : दि.15 : – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौंटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी वर्धा जिल्हयात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

जिल्हयातील नागरिकांसह सर्व लोक प्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नविन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तिंना प्रेरीत करणे, आरोग्य शिक्षण साधणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. जिल्हयातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य तपासणी त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे, आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड-19 चे संशयीत रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्या विषयी जागृती करणे या बाबी मोहिमेत राबविल्या जाणार आहेत.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम वैयक्तिक, कैटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसुत्रीवर आधारित  असणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे या बाबीचे महत्व नागरिकांना मोहिमेत पटवून दिल्या जाणार आहे.

वैयक्तिक स्तरावर, कैटुंबिक स्तरावर, सोसायटी-वसाहतीमध्ये घ्यावयाची काळजी, दुकाने-बाजार-मॉल्समध्ये खरेदीसाठी जातांना, कार्यस्थळी-कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी व खाजगी-सार्वजनिकरित्या प्रवास करतांना घ्यावयाची काळजी या बाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या मोहिमेव्दारे देण्यात येणार आहे.

मोहिमेची व्याप्ती

  • माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम जिल्हयातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाईल. या मोहिमेंतर्गत सर्व शहरे, गावे, वाडी, तांडे, पाडे इत्यादी मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल.
  • रोज सकाळी शरीराचे तापमान, प्राणवायू पातळी मोजून घ्यावी. हे आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक आहे. मास्कचा सदैव वापर करावा, मास्क काढून ठेवू नये, याबाबत कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांची काळजी घ्यावी.
  • सॅनिटाझरची लहान बाटली सदैव सोबत बाळगावी. त्याचा गरजेनुसार उपयोग करत रहावा. हाताची नियमितपणे स्वच्छता राखावी. साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवावेत.
  • पुरेसा आहार, पुरेशी झोप, व्यायाम, योग, प्राणायम आदिव्दारे प्रतिकारशक्ती टिकवून ठेवावी. जेवणात पालेभाज्यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्व, प्रथिने अशा सर्व पोषक बाबींनी युक्त पदार्थ जेवणात असावेत.
  • कुटुंबात वावरतांना कोरोना विषयक मार्गदर्शक तत्वांचे, सुचनांचे पालन करा. घरातील लहान मुले, जेष्ठ नागरिक यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे स्वच्छ धुवून ठेवावेत. नंतरच त्याचा आहारात उपयोग करावा. नातेवाईक मित्रांकडे जाणे टाळावे.
  • बाजारपेठेत खरेदीला जातांना काळजी घ्यावी. सुरक्षित अंतर पाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा.
  • कार्यालयात शक्यतो सुरक्षित अंतर ठेवूनच बैठक व्यवस्था करावी. कर्मचाऱ्यांना शक्यतो वर्क फ्रॉम होमचा पर्याय द्यावा. लिफ्टचा कमीत कमी वापर करावा.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असतांना मौन राखावे. सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये. सार्वजनिक वाहनात एक आसनावर एकाच व्यक्तीने आसनस्थ व्हावे. वाहनांमध्ये गर्दी करून दाटीवाटीने प्रवास करू नये. गर्दीचा प्रवास टाळावा. कमीत कमी ठिकाणी स्पर्श करावा.

       या सर्व बाबी जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारणे अतिशय गरजेचे आहे. जोवर कोविड विषाणूवर लस सापडत नाही तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून कोरोना साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी माझे कुंटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *